सांगली । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेतून इस्लामपूर येथील निखिल सुरेश पाटील याची उद्योग उपसंचालक वर्ग-1 (डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज) पदी नुकतीच निवड झाली. निखिल पाटील हा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गात राज्यात 5 वा आला.
आयआयटी मुंबईमधून त्याने इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण (एम.टेक.) घेतले.बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करण्याचा अनुभव घेवून प्रशासकीय सेवेत तो आता रुजू होत आहे.त्याचा जन्म शिक्षक पेशातील कुटुंबात झाला असून आजोबा स्व.हिंदुराव पाटील व वडील डॉ.सुरेश पाटील यांचा आदर्श ठेवून सामाजिक भान जपण्याचा त्याचा मापदंड आहे.आई प्रा. सी. एस. पाटील आणि सुविद्य पत्नी प्रीतिगंधा पाटील यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्याची यशोगाथा आणखी पुढे सरकली.
त्याचे मूळ गाव कामेरी असून इस्लामपूर येथील आदर्श बालक मंदिरमध्ये त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमधून तो जिल्ह्यात व राज्यात चमकला होता.महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 6 वा तर 10 वीच्या बोर्ड परीक्षेत राज्यात 11 वा तसेच स्कॉलरशिप, इंजिनिअरिंग प्रथम वर्षात विद्यापीठात त्याने प्रथम क्रमांक मिळविला.गेट परीक्षेत 99.11 असे त्याचे परसेंटाईल होते.2004 आणि 2007 मध्ये त्याला शिवाजी विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती.इस्लामपूर आरआयटीमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रा.डॉ.सुरेश पाटील यांचा निखिल हा मुलगा आहे.