Last Updated on 25 May 2023 10:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कविवर्य गोविंद पाटील यांचा आगळावेगळा पायंडा : शिक्षण,साहित्य,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
कोल्हापूर । ना कसला डामडौल ना कसला भपका व अनावश्यक प्रदर्शनही नाही.कुठेही भटजी नव्हता की कसलेही विधी नव्हते.सर्व प्रकारच्या परंपरागत कर्मकांडाला,विविध धार्मिक विधींना फाटा देऊन अगदी अनोख्या पद्धतीने ‘साखरपुडा’ झाला.भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथील पुरोगामी विचारांचे कृतिशील पाईक असलेले प्राथमिक शिक्षक,कविवर्य गोविंद पाटील व त्यांच्या सौभाग्यवती सुनिता यांनी आपली लेक ‘अस्मिता’ हिचा ‘साखरपुडा’ भारतीय संविधान पुस्तिकेचे पूजन आणि सामुहिक उद्देशिका वाचनासह उपस्थितांना पुस्तके भेट देवून साजरा केला.
कवीवर्य गोविंद पाटील यांची लेक अस्मिताचं लग्न घुलेवाडी (ता. चंदगड) येथील सूरज नारायण पाटील याच्याशी ठरलं आणि मग लेकीचा साखरपुडा आगळा वेगळा करायचा असं त्यांनी ठरवलं.नेहमीच धार्मिक विधीला फाटा देतच त्यांनी नवीन घरांत पूजा, होम- हवन अशांना थारा न देता जमलेली देणगी आश्रमशाळेतील भेट दिली होती.लेकीचा साखरपुडा आदमापूर इथे असाच आगळ्या पद्धतीनं करून समाजात आदर्श ठेवला आहे.
विचारांचं प्रतीक असलेली पुस्तकं या सोहळ्याच्या केंद्रस्थानी होती.कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अस्मिता आणि सूरज या उभयतांच्या हस्ते पुस्तकं भेट देण्यात आली.या निमित्ताने पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात किमान एकेक विचार जावा, मोबाईलच्या आहारी गेलेल्या घराघरातल्या नव्या पिढीने पुस्तकांमधला विचार समजून घ्यावा,अशी यामागची भूमिका होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचं पूजन,उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि उपस्थित लोकांना विविध पुस्तकांची भेट देण्यात आली.यावेळी साहित्यिक प्रा. एकनाथ पाटील व राजन कोनवडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून उद्देशिकेच वाचन केले.
ना कसला डामडौल ना कसला भपका व अनावश्यक प्रदर्शनही यावेळी दिसले नाही.पाहुण्यारावळ्यांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला.यावेळी साऊंड सिस्टीम सारख्या वाद्यांना फाटा देवून ओंकार निर्मित शिवगंधार प्रस्तुत मनबावरी गीतांनी उपस्थित रसिकांना सूरांनी चिंब भिजवले.शिक्षण,साहित्य,कला,संस्कृती आणि राजकीय क्षेत्रातील नामवंतांनी या सोहळ्याला हजेरी लावली.पाहुण्यारावळ्यातल्या,खेड्यापाड्यातल्या म्हाताऱ्याकोताऱ्या बाया मोठ्या अप्रुपाने या सोहळ्याचा अनुभव घेत होत्या आणि स्वयंस्फुर्तीने त्यात सहभागीही होत होत्या. उभयतांच्या या आगळ्या-वेगळ्या पायंड्याचे समाजातून कौतुक होत आहे.

यावेळी माजी प्राचार्य एम. जी. शिंदे,पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील,जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील,सचिव शंकरराव पवार,आभाळमाया सामाजिक संस्थेच्या लक्ष्मी पाटील,जि. प. चे माजी बांधकाम सभापती के. एस. चौगुले,माजी जि. प. सदस्य राहुल देसाई,प्राचार्य डॉ. अर्जुन कुंमार,प्रा. एच. आर. पाटील,रामचंद्र येसबा पाटील,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू,साहित्यिक विलास माळी, दत्ता मोरसे,विद्या खामकर मारुती म्हांगोरे,विक्रम वागरे,रवींद्र गुरव (पाचवडे),शिवाजी देसाई,प्रकाश केसरकर,कुंडलिक मोरे,रमेश वारके,प्रकाश सोनाळकरसह विजय पाटील,सुभाष पाटील,अरविंद सुतार,डी. वाय. देसाई,धनाजी आरडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…
ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या सावित्रीच्या लेकीला सदृढ कन्यारत्न; नुकतेच झाले ‘राजनंदिनी’ असे नामकरण









































































