Last Updated on 23 May 2023 11:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील.सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू असेल.मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 25 हजार सरकारी शाळांतील 64 लाख 28 हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील.
एक राज्य एक गणेवश ही संकल्पना या वर्षापासून अंमलात आणत आहोत. परंतू काही शाळांनी यापूर्वीच गणवेशाच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे तीन दिवस शाळेने ठरवून दिलेला गणवेश आणि बाकीचे तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी वापरतील. शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परिधान करतील. तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस घालतील, असे केसरकर यांनी सांगितले.
एक गणवेश करण्यामागे शिस्त लागावी असा हेतू आहे. यामुळे राज्यातील शासकीय शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. गणवेश योजनेसाठी वर्षाला 385 कोटीचा खर्च येईल, त्याचे कंत्राट निघणार आहे. या निविदा प्रक्रियेत कुणीही भाग घेऊ शकतो. याबाबत कुठल्याही कंपनीशी संगनमत नाही, असा दावा केसरकर यांनी केला.
असा असेल गणवेश
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा हा गणवेश असेल. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असेल. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाईडशी साधर्म्य साधणारा असेल, असेही केसरकर म्हणाले.
विद्यार्थ्यांना सरकार बूट आणि मोजेही देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी टापटीप आणि छान दिसतील. अनेकदा ग्रामीण भागात मुले अनवाणी शाळेत जातात. तसे आता होणार नाही. आधी मागासवर्गीय मुलांना गणवेश देत होतो, आता सगळ्या मुलांना गणवेश दिला जाणार आहेत. आमचा निर्णय शासकीय शाळांसाठी आहे. खासगी शाळांतील मुलांनाही सरकारकडून गणवेश देण्याचा मानस आहे, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.












































































