सांगली । ‘एनर्जी ड्रिंक्स’ एकाचवेळी प्रमाणापेक्षा जादा पिताय ? क्षणभर थांबा.कारण,यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान,गावातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये यासाठी आता अशा कॅफिनयुक्त थंडपेयांच्या विक्रीवर वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे.
कॅफिनयुक्त अनेक थंडपेये मार्केटमध्ये आहेत.गावामध्ये १८ वर्षा खालील लहान मुलांच्यामध्ये अशाप्रकारचे थंडपेय पिण्याचे प्रमाण आढळून आले आहे.अशा कॅफिनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा कॅफिनयुक्त थंडपेयांची विक्री करू नये अशी नोटीस बहे ग्रामपंचायतीने विक्रेत्यांना काढली आहे.
सरपंच संतोष दमामे यांनी सांगितले की,दुकानामध्ये विक्रीसाठी असणाऱ्या अनेक थंडपेयामध्ये कॅफिन वापरलेले असते.गावामध्ये १८ वर्षा खालील लहान मुलांच्यामध्ये अशाप्रकारचे थंडपेये पिण्याचे प्रमाण आढळून आले आहे.अशा कॅफिनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासर्व गोष्टींचा विचार करून अशा पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरुणांच्या वाढणाऱ्या व्यसनाधिनता या गोष्टीना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने मासिक सभेत ऐनवेळच्या विषयामध्ये अशा थंडपेयाच्या विक्रीवर बंदीचा ठराव झाला आहे.अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयांची आपल्या गावामध्ये विक्री करू नये.तसेच या प्रकारच्या थंडपेयाची जाहीरात आपल्या दुकानासमोर करू नये.तरी अशी कॅफिनयुक्त थंडपेये विक्री करताना निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस विक्रेत्यांना दिली असल्याची माहिती सरपंच संतोष दमामे यांनी दिली.