Last Updated on 07 May 2023 8:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला टोला
पंढरपूर । सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा न्यायालयाचा निर्णय येणार आहे.मात्र तो निर्णय काय आहे हे आपण सांगू शकत नाही.बहुतेक तो निर्णय फडनवीस यांना माहिती असावा,त्यामुळे ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतं असतील,असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.भविष्यात विरोधी पक्षांची एकजूट करून भाजपासमोर सक्षम पर्याय दिला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
भविष्यात विरोधी पक्षांची एकजूट करून भाजपासमोर सक्षम पर्याय
देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजपा पक्षांची सरकारं असून कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं समजते,असे ते म्हणाले.सरकारच्या प्रकल्पाचं स्वागत व्हावं मात्र असे प्रकल्प स्थानिकांना विचारात घेऊन उभारले जावेत,असे ते म्हणाले.बारसू इथल्या प्रस्तवित रिफायनरीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा,असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते.राजीनामा नाट्य नंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती.मात्र,आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार आहे,असे पवारांनी जाहीर केले.शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यात असंतोष आहे.त्यामुळे राज्यातील जनतेला आता बदल पाहिजे असे दिसते,असेही त्यांनी म्हटले आहे.









































































