मुंबई | महाराष्ट्र राज्य स्थापनेला 63 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक 1 मे 2023 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे,यासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 वाजेपूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावा,असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील.ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.
राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे.त्यानंतर ‘राज्यगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे.ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी/ अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे.सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-1091/30, दिनांक 2 मार्च, 1991 तसेच क्रमांक एफएलजी-1091/(2)/30, दिनांक 5 डिसेंबर,1991 तसेच क्रमांक एफएलजी-1098/(ध्वजसंहिता)/30, दिनांक 11 मार्च,1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी.राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल,याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा.स्थानिक लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्य सैनिक,शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे.अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा,यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा,असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.