Last Updated on 28 Apr 2023 7:26 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन
सांगली । सध्या उष्णता वाढत असून नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
चक्कर येणे,उलटी व मळमळ होणे,शरीराचे तापमान खूप वाढणे,पोटात कळा येणे,शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताचे लक्षणे आहेत.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे
🌑 तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
🌑 हलकी,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत,
🌑 बाहेर जातांना गॉगल्स,छत्री,टोपी,बूट व चपलांचा वापर करावा,
🌑 प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी,
🌑 उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी,व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा.
🌑 तसेच ओल्या कपड्यांनी डोके,मान व चेहरा झाकावा.
🌑 शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे,
🌑 घरी तयार करण्यात आलेली लस्सी,ताक,कैरीचे पन्हे,लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करावा.
🌑 अशक्तपणा,स्थूलपणा,डोकेदुखी,सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत
🌑 चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
🌑 गुरांना,पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे.
🌑 तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
🌑 घरे थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर व सनशेडचा वापर करावा.
🌑 रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.पंखे,ओले कपडे यांचा वापर करावा.
🌑 तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
🌑 कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
🌑 सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
🌑 पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
🌑 बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.
🌑 गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
🌑 रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
🌑 जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा.
🌑 टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी/धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे.
🌑 छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात.
काय करू नये
✪ लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
✪ दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
✪ गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
✪ बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत,
✪ दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे.
✪ उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.
✪ मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
✪ उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये.
✪ मद्य सेवन,चहा,कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये.
✪ त्यामुळे डीहायड्रेशन होते.उन्हात वाहने शक्यतो चालवू नये.
✪ उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा.
✪ ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर रहावे.









































































