जालना । पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच 107 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.गणेश शेषेराव शिंदे (वय-35) असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी केली.
या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे.त्यामुळे गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयाची लाचेची मागणी केली.तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार केली.
एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता गणेश शिंदे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये स्विकाण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचला.तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर शिंदे याला सापळा पथकाचा संशय आल्याने तो लाचेच्या रकमेसह स्वतःच्या खाजगी वाहनातून पळू गेला.पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून गणेश शिंदे याला पकडले.गणेश शिंदे याने लाचेची रक्कम पाठलागा दरम्यान फेकून देऊन पुरावा नष्ट केला.पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळून आले आहे.पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याच्यावर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.