Last Updated on 11 Apr 2023 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पाचगणी । शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत प्रसिध्द ग्रामीण कथाकथनकार प्राचार्य आप्पासाहेब खोत यांनी कथाकथनाच्या कार्यक्रमात पाचगणीतील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी सादर केलेल्या गवनेर या कथेला रसिकांनी मनमुराद दाद दिली.
पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंपताना आप्पासाहेब खोत यांनी गवनेर ही कथा सादर केली.गवनेर या कथेतून त्यांनी मुक्या जनावरांना जीव लावला तर ते माणसाचे जीवलग मित्र बनतात असा संदेश दिला.
व्याख्यानमालेचे उद् घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षा व प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.पूनम कांबळे (गोळे )होत्या.यावेळी मा.नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजिव सेवक प्राचार्य दिलीप सपकाळ,व्याख्यानमालेचे अध्यक्ष व महाबळेश्र्वर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रविणशेठ भिलारे,प्र.प्राचार्य डाॅ.सतीश देसाई,व्याख्यानमालेचे समन्वयक डाॅ.बी.एन.कोकरे,प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर,मा.राजेंद्र भिलारे,ह.भ.प.विनोद कळंबे महाराज,राष्टृपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व साहित्यिक जगन्नाथ शिंदे गुरूजी,सामाजिक कार्यकर्ते राम जाधव,मा.प्रकाश शिंदे,सामाजिक कार्यकर्ते संतोष कवी,सामाजिक कार्यकर्ते जे.के.आंब्राळे,मा.जयवंत भिलारे,प्राचार्य डाॅ.जे.ए.म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ म्हणाले, शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे व्याख्यानमाला चालवित आहे.व्याख्यानमालेचे कार्य हे समाज परिवर्तन घडविणारे कार्य आहे.साहित्य हे जीवनाला सुसंस्कृत करते.तरूणांनी साहित्याचे वाचन करून तसेच नवीन विषयावर लेखन करून साहित्य परंपरेला समृध्द करावे. डाॅ.सुनील गुरव यांचे ” द कल्ट आॅफ मल्टिकल्चरॅलीजम इन एशीयन – आॅस्टृलीयन नाॅवेलस ” यांचे हे पुस्तक समाजात मूल्ये व संवेदनशिलता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.पूनम कांबळे (गोळे) म्हणाल्या, पाचगणीने व्याख्यानमालेद्वारे ज्ञान संपादनाची वैभवशाली परंपरा जपली आहे.महेता काॅलेजने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिकदृष्टीने घडविलेले समाजपरिवर्तन उल्लेखनीय आहे.
प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डाॅ.तुकाराम राबाडे यांनी करून दिला.सूत्रसंचालन डाॅ. अमृता कुलकर्णी व प्रा.शितल पवार यांनी केले.आभार व्याख्यानमाला समन्वयक डाॅ.बाळासाहेब कोकरे यांनी मानले.

यावेळी साहित्यिक आप्पासाहेब खोत,साहित्यिक जगन्नाथ शिंदे,संस्थेचे प्रशासकीय सहसचिव प्राचार्य डाॅ राजेंद्र शेजवळ,प्राचार्य डाॅ.सतीश देसाई आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डाॅ.सुनील गुरव लिखित “द कल्ट आॅफ मल्टिकल्चरॅलीजम इन एशीयन – आॅस्टृलीयन नाॅवेलस ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्र विभागाच्यावतीने आयोजित” अमृत महोत्सवी भारतीय अर्थव्यवस्था सद्यस्थिती” या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयावरील पोस्टरचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे,स्वामी विवेकानंद,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे,ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्याप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.व्याख्यानास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.










































































