Last Updated on 09 Apr 2023 8:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बहे शिवारात आढळला बिबट्या; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
युवकाने प्रसंगावधान राखत जागेवर ट्रॅक्टर वळवल्याने टळला अनर्थ
सांगली । बहे-खरातवाडी रस्त्यावर असणाऱ्या कुरणाच्या शेतात शनिवारी रात्री एका युवकाला बिबट्या दिसला.संबंधित युवकाच्या दिशेने बिबट्याने येण्याचा प्रयत्न केला.पण,युवकाने प्रसंगावधान राखत जागेवर आपला ट्रॅक्टर वळवला.टॅक्टरच्या प्रकाशाने ‘त्या’ बिबट्याने उसाच्या फडात धूम ठोकली.
दरम्यान,बहे,फार्णेवाडी परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
बहे येथील युवक अवधूत विक्रम पाटील हा बहे-खरातवाडी रस्त्यावरील कुरणाच्या परिसरातील शेतात रोटर मारण्यासाठी गेला होता.आज रात्री साडेआठच्या सुमारास रोटर मारून शेतातून बाहेर पडत असताना त्याला बिबट्या ट्रॅक्टरकडे येताना दिसला.अचानक समोर बिबट्याला पाहून अवधूत थोडासा विचलित झाला.पण,प्रसंगावधान राखत त्याने एकदम जागेवरच ट्रॅक्टर वळवला.ते बघून बिबट्याने तेथून धूम ठोकली.लगेच त्याने भ्रमणध्वनीवरून मित्रांना कल्पना दिली.तोपर्यंत आजूबाजूचे शेतकरी,ग्रामस्थ तेथे जमा झाले.त्यांनी शोधमोहीम राबवली.
दरम्यान,गेल्या पंधरा दिवसापासून बहे,फार्णेवाडी परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.फार्णेवाडी येथे सायाळाचा पाठलाग करत बिबट्या बुधवारी सहाच्या सुमारास लोकवस्तीत शिरला होता.त्यानंतरही फार्णेवाडी परिसरात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे.गावालगतच्या शेतात बिबट्याचे ठसे मिळून आले आहेत.दरम्यान,तीन महिन्यापूर्वी बहे-बोरगाव रस्त्यावर फार्णेवाडी जवळ बहेच्या शिवेवर बछड्यांच्या शोधात असलेला बिबट्या पुलाच्या कठड्यावर बसलेला काहींना दिसला होता.पण,रस्त्यावरून निघालेल्या वाहनाच्या प्रखर प्रकाशाने ‘त्या’ बिबट्याने उसाच्या फडात धूम ठोकली होती.तत्पूर्वी,बहे-बोरगाव रस्त्यावर फार्णेवाडी जवळ बहेच्या शिवेवर बिबट्याच्या तीन बछड्यांचे दर्शन झाले होते.परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.









































































