Last Updated on 07 Apr 2023 12:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या 14 एप्रिलपासून दुर्मिळ नाणी,नोटा व स्टॅम्पचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी सभागृहात येत्या 14, 15 व 16 एप्रिल असे तीन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे.सकाळी 10 ते सायं. 07 यावेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.आधुनिक काळात समाज माध्यमांमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सर्व जग जवळ आले आहे.आधुनिक जगात वावरताना जगभरातील देशांच्या चलनांची माहिती असणे आवश्यक आहे.चलनाबाबतची जनजागृती होण्याच्या हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
भारतासह जगभरातील 175 देशांच्या नाणी, नोटा व पोस्टल स्टॅम्पस् या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.जगातील सर्वात मोठ्या किंमतीची 50 बिलियन डॉलरची झिंबाब्बे या देशाची नोट पाहता येईल.भारतातील ऐतिहासिक, संस्थानकालीन, ब्रिटीशकालीन,आधुनिक काळातील नाणी, नोटा पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळणार आहे.शिवकालीन (शिवराई), मोगलकालीन नाणी पाहण्याची संधी,जगभरातील जवळपास 100 देशांचे पोष्टल स्टॅम्पस् पाहता येतील.जगभरातील सर्व खंडातील देशांची नाणी व नोटा.सहा इंच x आठ इंच आकाराची हजार रुपयाची नोट,अमेरिकेतील विविध काळातील नाणी,तज्ज्ञांकडून नाणी, नोटा, पोष्टल स्टॅम्पस्ची माहिती ही प्रदर्शनाची वैशिष्ट्यै असणार आहेत.









































































