Last Updated on 05 Nov 2023 8:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ब्राजीलिया | जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान फुटबॉलपटू,तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचे निधन झाले आहे वयाच्या 82 व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला.पेले यांना कोलन कँसर झाला होता.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र,फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा खेळाडू कँन्सरविरोधातील झुंज हरला.गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.
महान फुटबॉल खेळाडूंपैकी एक असलेले पेले अगोदर सँटोस क्लब आणि नंतर ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाकडून खेळले.आपल्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक फुटबॉलवर आपला अमीट ठसा उमटवला.त्यामुळे त्यांना ब्राझील सरकारनं ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून घोषित केलं होतं.एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची घटना फारच दुर्मिळ असते.पण, पेले यांनी ही घटना सत्यात उतरवून दाखवली होती.
पेले यांनी ब्राझीलसाठी 114 मॅचेस खेळून 95 गोल केले होते. त्यांना खरेदी करण्यासाठी युरोपियन फुटबॉल क्लबमध्ये अक्षरश: स्पर्धा लागली होती. ते थांबवण्यासाठी ब्राझील सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता. सरकारनं पेले यांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ घोषित केलं होतं. 82 व्या वर्षी पेले यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, ब्राझीलच्या पिवळ्या नंबर 10 जर्सीमधील पेले यांची प्रतिमा फुटबॉल चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील.
पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.”आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.
पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.










































































