Last Updated on 18 Nov 2022 2:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांचे आवाहन
ठाणे | प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. ई-पीक पाहणीच्या नोंदी या पिक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई इत्यादी बाबींसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीची कार्यवाही 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. यासाठी सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप सुधारित आवृत्ती-2 गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून रब्बी हंगामातील पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप यावर्षीच्या सुरू करण्यात आलेली आहे. नवीन सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी 48 तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्या आधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. पूर्वीच्या मोबाईल ॲप मध्ये असलेल्या मुख्य पिके व दुय्यम पीके नोंदवण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदवण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची ही अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. माने यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहेत. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. माने यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पिक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. ही पीक पहाणी गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10 टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होतील. ॲप वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये “मदत” हे बटन देण्यात आलेले आहे. या बटनावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. त्याचा वापर करून शेतकरी अँप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतात, असे त्यांनी सांगितले.












































































