Last Updated on 13 Nov 2022 9:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संपूर्ण मानवी जीवनासाठी किती क्रांतीकारी ठरू शकतो,याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेव्दारे संपूर्ण जगासमोर ठेवले आहे. डिजिटल इंडिया मोहीम भारतामध्ये सुलभ राहणीमानाचा सर्वात मोठा आधार बनली आहे.तर केंद्र सरकार सातत्याने यामध्ये नवनवीन सेवांचा समावेश करीत आहे.रूपे कार्ड ते यूपीआयपर्यंत वित्तीय सेवा डिजिटल झाल्या आहेत.तर 16 ऑक्टोबरला देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बॅंकिंग युनिटांचा प्रारंभ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसांचे जीवन अधिक सुकर बनविण्याच्या दिशेने टाकले आणखी एक ऐतिहासिक पाऊल…
स्वातंत्र्यानंतर सात दशकांपर्यंत बॅंकिंग सुविधांमध्ये गरीबांचा समावेश तसा अल्पच होता.याबाबतीत भारताने गेल्या 8 वर्षांमध्ये 47 कोटींपेक्षा अधिक जन धन बॅंक खाते उघडण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.प्रत्येक सुविधेसाठी रांग लावण्यापासून ते जनधन- आधार – मोबाइल ट्रिनिटी आणि वित्तीय समावेशनाबरोबरच एक मजबूत डिजिटल वित्तीय परिसंस्था तयार करण्यापर्यंतचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार ध्येय गाठण्यासाठी निरंतर सुरू आहे.आता या टप्प्यावर केवळ एकच लक्ष्य आहे,ते म्हणजे – तंत्रज्ञानाचा लाभ देशातल्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे.हे ध्येय गाठण्यासाठी सुरू झालेल्या प्रवासातला मधला टप्पा म्हणजे डिजिटल बॅंकिंग युनिटही आहे16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बॅंकिंग युनिटांचा प्रारंभ केला.यामुळे भारतात कधीकाळी गरीबांच्या दृष्टीने दूर असलेली बॅंकिंग सेवा, गेल्या 8 वर्षांमध्ये बॅंका स्वतःच गरीबांपर्यंत पोहोचल्या.हा प्रवास आणि वित्तीय समावेशनाबरोबरच समाजातल्या अगदी शेवटच्या टोकाला असणाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्व आर्थिक लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा उल्लेख त्यांनी केला.पंतप्रधान म्हणाले, आम्ही समाजाच्या अंतिम पायरीवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा विचार करून धोरणे बनविली आहेत.आम्ही दोन गोष्टींवर एकाच वेळी काम केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे- बॅंकिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा आणून , ती बळकट करणे, त्यामध्ये पारदर्शकता आणणे आणि दुसरे काम म्हणजे, वित्तीय समावेशन! आधी विचार केला जात होता की, गरीब स्वतःहूनच बँकेमध्ये येईल. बॅंकिंग सेवाशी जोडला जाईल. परंतु आम्ही ही पद्धतच बदलून टाकली. आम्ही निर्धार केला की, बॅंकच स्वतःच आता गरीबाच्या घरापर्यंत जाईल. यासाठी सर्वात आधी आम्हाला बॅंक आणि गरीब यांच्यामध्ये जे अंतर होतं,ते कमी करायचे होते.हे प्रत्यक्ष म्हणजे शारीरिक अंतर आम्ही दूर केले. त्याचबरोबर लोकांच्या दृष्टीकोनातून जे मानसिक अंतर होते, तेही आम्ही कमी केले.कारण असे मानसिक अंतर खूप मोठा अडथळा होता.आम्ही बॅंकिंग सेवा दूर-दुर्गम भागांमध्ये अगदी घरा-घरांपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला प्राधान्य दिले.आज भारतातल्या 99 टक्क्यांपेक्षाही जास्त गावांमध्ये 5 किलोमीटर परिघाच्या क्षेत्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या बॅंकेची शाखा,बॅंकिंग आउटलेट किंवा बॅंकिंग मित्र,बॅंकिंग प्रतिनिधी उपलब्ध आहेत.याशिवाय, देशामध्ये जे टपाल कार्यालयाचे व्यापक जाळे होते,तेही आता इंडिया पोस्ट बॅंकच्या माध्यमातून बॅंकिंगमधील मुख्य प्रवाहाचा भाग बनले आहे.आज देशामध्ये प्रति एक लाख प्रौढ नागरिकांमागे जितक्या बॅंक शाखा कार्यरत आहेत,त्यांची संख्या जर्मनी,चीन आणि दक्षिण अफ्रिका या देशांमध्ये असलेल्या एकूण बॅंक शाखांपेक्षाही जास्त आहे.
मजबूत बॅंकिंग प्रणाली म्हणजेच मजबूत अर्थव्यवस्था
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातल्या बॅंकिंग प्रणालीवर अवलंबून असते.म्हणजेच बॅंकिंग प्रणाली मजबूत असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्थाही तितकीच प्रगतीशील असते.आज भारताची अर्थव्यवस्था सातत्याने प्रगतीची-पुढची वाटचाल करीत आहे.यामागे असलेले कारण म्हणजे,या 8 वर्षांमध्ये देशात 2014पूर्वी असलेली ‘फोन बॅंकिंग’ प्रणाली बदलून डिजिटल बॅंकिंगमध्ये परिवर्तीत झाली आहे.आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये याचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही एनपीएची माहिती मिळावी,यासाठी या एकूणच प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने काम केले. लाखो- कोट्यवधी रूपये बॅंकिंग व्यवस्थेमध्ये परत आले.एनपीएशी संबंधित प्रकरणे सोडविण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी नियमांची मदत घेवून ही प्रकरणे वेगाने निकालात काढली.आम्ही कर्जासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला.बॅंकांच्या विलिनीकरणासारखे महत्वपूर्ण निर्णय ‘धोरणात्मक लकव्या’चे जणू शिकार बनले होते, आम्ही असे निर्णयच अतिशय ठामपणे घेतले.निर्णय घेतले आणि त्यानुसार लगोलग पावले उचलली.आज या निर्णयांचे परिणाम आपल्या समोर आहेत. दुनियेमध्ये या गोष्टींचे कौतुक होत आहे.
जनधन खात्यांचे महत्त्व
2014 मध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामध्ये कमीतकमी एक बॅंक खाते असले पाहिजे,यासाठी मोहीम सुरू केली त्यावेळी अनेक लोक म्हणाले की,गरीब बॅंकेत खाते उघडून काय करेल? परंतु बॅंकेत खाते असण्याची ताकद काय असते,हे आज पूर्ण देश पहात आहे.पंतप्रधान मोदी यांनी याचा उल्लेख करताना सांगितले, माझ्या देशातल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला बॅंकेची ताकद काय असते, याचा अनुभव येत आहे.बॅंकेमध्ये खाते असल्यामुळे आम्ही गरीबांना अतिशय कमी हप्त्यामध्ये विम्याची सुविधा दिली.बॅंकेत खाते असल्यामुळे गरीबांना विनाहमी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बॅंकेत खाते असल्यामुळे गरीब लाभार्थींपर्यंत अनुदानाचा निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये पोहचवला जात आहे. बॅंक खात्याच्या माध्यमातून गरीबांना घरकुल बनवायचे असो,शौचालय बनवायचे असो, गॅससाठी मिळणारे अनुदान असो, थेट त्यांच्या खात्यामध्ये देणे शक्य झाले आहे. अलिकडेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही याचे खूप कौतुक केले आहे.
वित्तीय समावेशनामुळे विकासाचा मार्ग
2015 मध्ये केंद्र सरकारच्यावतीने जनधन -आधार- मोबाइल (जॅम) ट्रिनिटीबरोबर सर्वसामान्य माणसांसाठी विकासाचे नवे मार्ग मुक्त केले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला लगाम लावण्याचे काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘पैसे वरून यायचे परंतु खाली असलेल्या गरीबांपर्यंत पोहचेपर्यंत गायब व्हायचे. आता मात्र डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणामुळे पैसे ज्याच्या नावाने दिले जातात, त्याच्याच बॅंक खात्यामध्ये जमा होतात. तेही अगदी वेळेकर जमा होतात. वेगवेगळ्या येाजनांमध्ये आत्तापर्यंत डीबीटीच्या माध्यमातून 25 लाख कोटी रूपयांपेक्षाही जास्त निधी हस्तांतरित केला आहे.
बॅंकिंग सेवांपासून ते डिजिटल बॅंकिंगपर्यंत
जन धन खात्यांमुळे बॅंकिंग सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली तर यूपीआय आणि रूपे कार्डमुळे नव्या आकांक्षांचे व्दार मुक्त झाले.डिजिटल बॅंक युनिटच्या माध्यमातून कागदपत्रांच्या जंजाळातून मुक्तता मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख करताना सांगितले,या सेवा -कागदपत्रे,लेखी दस्तऐवज या जंजाळातून मुक्त असतील.आणि पहिल्यापेक्षा अधिक सुलभ असतील.याचा अर्थ यामध्ये सुविधा असेल आणि एक मजबूत डिजिटल बॅंकिंग सुरक्षाही असेल.गावांमध्ये,लहान शहरांमध्ये कोणीही व्यक्ती ज्यावेळी डिजिटल बॅंकिंग युनिटची सेवा घेत असेल तर त्याला पैसे पाठविण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोप्पे, सुलभ होईल.सर्व गोष्टी ऑनलाइन केल्या जातील.डिजिटल सेवांबरोबरच बॅंकिंग प्रणालीने फक्त सर्वसामान्य माणसांचे जीवन अधिक सुगम बनविण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे,असे नाही तर देशाला एका नवीन युगाच्या मार्गाने नेण्यासाठी एक ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. म्हणूनच फिनटेक आज भारताच्या धोरणांमध्ये केंद्रबिंदू आहे. डिजिटल बॅंकिंग युनिट निश्चितपणे फिनटेकच्या या विचारांना नवे व्यापक बनविण्याचे काम करेल.
डिजिटल बॅंकिंग युनिट म्हणजे कागदपत्रांच्या जंजाळातून मुक्ती!
डिजिटल बॅंकिंग युनिट (डीबीयू) विशिष्ट ‘फिक्स्ड पॉइंट युनिट’ आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी घोषणा केली होती. ज्या लोकांकडे आपला संगणक, लॅपटॉप अथवा स्मार्टफोन नाही, असे लोक या डिजिटल बॅंकिंग युनिटमध्ये जाऊन बॅंकिंग सेवांचा डिजिटल माध्यमातून लाभ घेऊ शकतात. या बॅंकिंग युनिटमध्ये जावून ते डिजिटल माध्यमातून आपले काम स्वतःच करू शकतील. या डीबीयूमध्ये इंटरनेटसह इतर सर्व सुविधा असतील.या डिजिटल बॅंकिंग युनिटमध्ये लोकांना बचत खाते उघडणे, रोख रक्कम हस्तांतरित करणे, मुदत ठेव जमा करून गुंतवणूक करणे, कर्जासाठी अर्ज करणे, देण्यात आलेल्या धनादेशाचे वटविणे थांबविणे म्हणजेच धनादेशाच्या पैसे देणे रोखण्याविषयी सूचना देणे, कर भरणे, इतर बिले भरणे, वारसा नामांकन करणे, यासारख्या वेगवेगळ्या सुविधा बॅंकिंग डिजिटल युनिटमध्ये मिळतील.यामुळे डिजिटल वित्तीय साक्षरतेचा प्रसार होईल आणि यामध्ये ग्राहकांना सायबर सुरक्षा, जागरूकता आणि सुरक्षा उपाय यांच्याविषयी शिक्षित करण्यावर विशेष भर दिला जाईल. सार्वजनिक क्षेत्रांतल्या 11 बॅंका, 12 खाजगी बॅंका आणि एक लघु वित्त बॅंक या प्रयत्नांमध्ये सहभागी झाले आहेत.
एक राष्ट्र- एक खताचा ब्रॅंड बनला ‘भारत’
![]()
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लहान शेतकरी बांधवांना कसा लाभ होत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पीएम शेतकरी सन्मान निधी आहे. या योजनेला प्रारंभ झाल्यापासून दोन लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे.’’
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान 
शेतकरी आत्मनिर्भर व्हावा आणि शेती आधुनिक व्हावी, असे लक्ष्य निश्चित करून गेल्या 8 वर्षांमध्ये एकापाठोपाठ एक अनेक पावले उचलण्यात आली आहेत. कृषीविषयक अंदाजपत्रकामध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये पाचपटींपेक्षा अधिक वाढ केली आहे. बियाणांपासून ते पीक विम्यांपर्यंत, सिंचनापासून ते खते आणि बाजारपेठेपर्यंत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना राबवून शेतीशी निगडित स्टार्टअप, सरकारची धोरणे आणि घेतलेले निर्णय शेतीसाठी समग्र आणि समावेशी ठरत आहेत. याच कारणांमुळे आज भारतामध्ये कृषी क्षेत्राचे स्वरूप सातत्याने आधुनिक होत आहे. शेतकरी बांधवांच्या परिश्रमामुळेच देश कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे.तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक पद्धतीनेही शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. नैसर्गिक शेतीवरही केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच शृंखलेमध्ये शेतकरी बांधवांच्या प्रत्येक लहान-लहान गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधीच्या रूपाने एक मोठा निर्णय घेतला आहे.थेट शेतकरी बांधवांच्या बॅंक खात्यामध्ये वर्षभरातून तीन हप्त्यामध्ये 6 हजार रूपयांचा निधी हस्तांतरित केला जात आहे.आत्तापर्यंत 11 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये 2 लाख कोटींपेक्षा अधिक निधी हस्तांतरीत केला आहे. या सन्मान निधी अंतर्गत 17 ऑक्टोबरला 12 वा हप्त्याच्या रूपामध्ये 8 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी हस्तांतरित केला आहे.
कृषी क्षेत्रामध्ये स्टार्टअपला आता नवीन ओळख दिली जात आहे. शेतकरी संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांनी 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन केले. आता देशामध्ये जिल्हा स्तरावर सुरू होणाऱ्या 600 समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व समस्यांवर उत्तर मिळू शकणार आहे.या सुविधांमध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशक, एकाच स्थानी माती आणि बीज परीक्षण होणार आहे.तसेच नॅनो यूरियाची उपलब्धताही या केंद्रांमधून होणार आहे. जैविक खतही शेतकऱ्यांना या केंद्रातून मिळू शकणार आहे. शेतीसाठी लागणाऱ्या खरेदीसाठी,शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या स्थानी जाण्याची आता गरज पडणार नाही.लहान कृषी उपकरणांपासून ते ड्रोनपर्यंत सर्व आधुनिक उपकरणे या केंद्रांमधून शेतकरी भाडेतत्वावर घेवू शकतील किंवा खरेदीही करू शकतील.या केंद्रांवर उत्तम कृषी पद्धतीविषयी माहिती देण्यात येईल.कृषीसंबंधी योजनांविषयीही शेतकरी बांधवांना माहिती दिली जाईल.शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी खतांच्या दुकानांना टप्प्याटप्प्याने नियोजनपूर्वक प्रधानमंत्री शेतकरी समृद्धी केंद्रांमध्ये परिवर्तित केले जाईल.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन खत योजनेअंतर्गत ‘एक देश- एक खत’ याचा प्रारंभ करण्यात आला.आता एकाच ‘भारत’ या ब्रॅंडच्या रूपामध्ये सर्व खते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.प्रधानमंत्री भारतीय जन खत प्रकल्पाअंतर्गत -एक राष्ट्र एक खत,चा प्रारंभ झाल्यामुळे आता वेगवेगळ्या कंपन्यांऐवजी खताचा ‘भारत’ हा एकच ब्रॅंड बाजारामध्ये उपलब्ध असेल,आणि या ‘भारत’ खताची विक्री केली जाईल.हे खत सर्व समृद्धी केंद्रांवर उपलब्ध असेल.
साभार : न्यू इंडिया समाचार











































































