मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. आज (दि. 07) मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्या (दि. 08) विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात विजांसह पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार नसून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हवामान विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबेल.