राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस; मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाड्यात शक्यता
पुणे | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पुढील ३ दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी येणारे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, पुन्हा पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणखी तीन-चार दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांतच पाऊस होईल. २ ऑक्टोबरपासून मात्र या भागातही विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत ईशान्येकडील राज्ये आणि दक्षिणेकडेही पाऊस असणार आहे.
गुरुवारी परतीच्या प्रवासाला गती मिळाली असून, पंजाब, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीतून मोसमी पाऊस माघारी फिरला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पुणे शहरात मुसळधार
पुणे शहरात गुरुवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते पुन्हा तुंबले. सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेलाच पाऊस झाल्याने घराबाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.