22 सप्टेंबर
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती …वंदन कर्मवीरांना…!
ग्रामीण भागातील बहुजनांच्या शिक्षणासाठी, स्वलांबन, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि स्वाध्याय या चतु:सूत्रीवर आधारित कर्मवीर भाऊराव पाटील यांनी व्यापक जनचळवळ उभारली. परिघावरील माणूस समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि केंद्रस्थानी आणण्यासाठी अण्णांनी सेवाभावी कार्यकर्त्यांचे व्यापक मोहोळ उभारले.
कर्मवीर अण्णांचा जीवन परिचय करून देणारी मराठी व हिंदीत पन्नासहून अधिक पुस्तके आहेत. अण्णांच्यावर लिहिलेल्या दोन इंग्रजी चरित्रांनी अण्णांचा उच्च दर्जाचे शिक्षणतज्ञ म्हणून विचार केला आहे. अण्णांचे पहिले इंग्रजी चरित्र लिहिण्याचा मान डॉ. अंजीलवेल मॅथ्यू यांच्याकडे जातो. मॅथ्यू कोल्हापूरच्या अध्यापक महाविद्यालयात काम करत असताना त्यांचा अण्णांशी परिचय झाला. मानसशास्त्र व शिक्षणक्षेत्रात तज्ञ असलेल्या मॅथ्यूना अण्णांचे रिमांड होममधील मुलांबद्दलचे कार्य आवडले 1950 ला सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारल्यावर त्यांनी अण्णांचे चरित्र लिहायला सुरुवात केली. सलग सहा वर्षे काम केल्यानंतर अण्णांचे पहिले इंग्रजी चरित्र 1957 ला प्रकाशित झाले .अण्णांच्या मृत्यूनंतर चरित्राचा दुसरा भाग लिहिला. या चरित्राला डॉ. जॉन मथाई, डॉ. धनंजय गाडगीळ यांनी प्रस्तावना लिहिली आहे. वि.स.वाळिंबे यांनी या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवाद केला. ए. व्ही.मॅथ्यू यांना अण्णांनी सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅरिस्टर पी.जी.पाटील यांनी अण्णांच्या आठवणी कर्मविरोपनिषिद या नावाने प्रसिद्ध केल्या नंतर या आठवणीमध्ये अनेक सुधारणा करून ‘द बाऊंटीफुल बनियान’ हे इंग्रजी चरित्र चार खंडात प्रसिद्ध केले. बाऊंटीफुल म्हणजे विपुल, पुष्कळ, उदार तर बनियान म्हणजे वडाचे झाड. या दोन्ही इंग्रजी चरित्रांमध्ये अण्णांच्या आयुष्यातील घटनाक्रम, संघर्ष आणि शिक्षण विस्ताराच्या कार्याचा विश्वसनीय आढावा घेतला आहे. ए. व्ही. मॅथ्यू यांना अण्णांचा सहवास 7 वर्षे लाभला तर बॅरिस्टर पी.जी.पाटील हे 25 वर्षे अण्णांच्या सान्निध्यात होते.
दोन्ही इंग्रजी चरित्रांनी अण्णां हे उच्च दर्जाचे शिक्षणतज्ञ होते अशी मांडणी केली आहे. अण्णा जुन्या काळातील सहावी नापास होते. त्यामुळे त्यांना शिक्षणतज्ञ म्हणायचे का ? असा प्रश्न होता. मात्र हे चरित्रकार आपल्या मांडणीत म्हणतात की, भारतीय परंपरेत अल्पशिक्षित सम्राट अकबराने आपल्या राज्यात शेती, अकौटंसी, प्रशासन असे विषय सुरू केले. शिक्षण धर्मनिरपेक्ष केले. राधाकृष्णन यांनी 1948 ला आपल्या उच्च शिक्षणाच्या अहवालात अशी नोंद केली आहे की, फारसे औपचारिक शिक्षण नसलेल्या राईट बंधूनी सायकलच्या दुकानात विमानाचा शोध लावला. अनुवंशिकितेचे नियम तयार करणार जॉर्ज मेंडल यांच्याकडे स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. बागेचा तुकडा आणि कबुतरांची खुराडी यांच्या जोरावर त्यांनी आपले शोध लावले. जेम्स वॅट, रॉबर्ट ओवेन, जॉर्ज स्टीफन्सन हे औद्योगिक क्रांतीचे प्रणेते कमी शिकलेले व प्रयोगशाळांशिवाय काम करणारे होते. या सर्वांना आपण व्यवहारी तत्वज्ञ म्हणू शकतो. अण्णांचे तत्वज्ञान याच धर्तीवर विकसित झाले. अण्णा हे व्यवहारी शिक्षणतज्ञ होते. आण्णांनी जात, धर्म, पंथ असा भेद न करता सर्व जाती धर्माच्या मुलांना आपल्या वसतिगृहात प्रवेश दिला. समकालीन नागरी समाजसुधारकांपेक्षा अण्णा हे फुले, शाहू या नांगरी समाजसुधारकांच्या गटात मोडतात. वसतिगृहातील मुले एकत्र स्वयंपाक करत, एकत्र जेवत, एकत्र राहत. या अण्णांच्या प्रयोगामुळे वसतिगृहे ही जाती, जातीमध्ये सामंजस्य वाढविणारी ठरली.
शाहू महाराजांचा वारसा जपत अण्णांनी प्रभावी वसतिगृह संस्कृती विकसित केली. ग्रामीण भागातील बहुजनांच्या शिक्षणासाठी हा नवा व क्रांतिकारक प्रयोग होता. अण्णांच्या कार्यामुळे प्रभावीत झालेल्या महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघामार्फत रयत शिक्षण संस्थेला वार्षिक अनुदान सुरू केले. महात्मा गांधींच्या मृत्युनंतर अण्णांनी त्यांच्या स्मृतीसाठी 101 शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.अण्णांचे स्वालंबी शिक्षण श्रमाला महत्व देणारे व श्रम हीच पूजा मानणारे होते. शिक्षणासाठी वार लावणे, माधुकरी मागणे याबाबींना त्यांचा विरोध होता. विद्यार्थ्यांनी फोडलेली खडी हेच आपले डॉलर अशी अण्णांची भूमिका होती. दोन्ही चरित्रकारांनी अण्णांच्या ‘कमवा – शिका’ योजनेची तुलना अमेरिकेतील बुकर टी वॉशिंग्टन यांच्या ‘कमवा – शिका’ योजनेशी केली आहे. बेळगावच्या मिलींद गुणाजी यांनी भाषांतरित केलेले बुकर टी वॉशिंग्टन यांचे चरित्र अण्णांनी वाचले होते. पी.जी.पाटील या गोष्टीचा उल्लेख ‘बुकर टी टू भाऊराव पी’ असा करतात. अमेरिकेतील काही महाविद्यालयांच्या अगोदर श्रमाच्या मोबदल्यात उच्च शिक्षण मोफत, अशी योजना सुरू करण्याचे श्रेय अण्णांच्याकडे जाते. त्यांनी शाहू महाराजांप्रमाणेच प्राथमिक शाळा चालविण्यासाठी मंदिरांचा आधार घेतला. अण्णांच्या श्रमाधिष्ठीत आणि बहुजनासाठीच्या व्यापक शिक्षण चळवळीमुळे समकालीन स्वातंत्र्य चळवळ, समाजकारण आणि राजकारणाला उच्च दर्जाचे मनुष्यबळ मिळाले. ग्रामीण बहुजन समाज साक्षर करण्याची अण्णांची विधायक व रचनात्मक शिक्षण चळवळ बिगर राजकीय कृतीप्रवणतेची प्रतीक बनले.

प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर