Last Updated on 17 Sep 2022 6:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उत्साहात
औरंगाबाद । गेल्या दोन महिन्यात आपल्या सरकारने जवळपास 450 नवीन निर्णय घेतले असून अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यात प्राध्यापकांनाही न्याय मिळेल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, नारायण कुचे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष, मुत्सद्दी, धोरणी आणि रणधुरंदर होते. त्यासोबतच ते कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ व्यवस्थापकही होते. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या महाराजांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्या दृष्टीने विविध मागण्यांबाबत शासन निश्चितच सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठवाड्याच्या भूमिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी आणि परिवर्तनशील विचारांचाही वारसा लाभला आहे. याच भूमीत बाबासाहेबांनी शैक्षणिक चळवळीचे रोपटे लावले आहे. त्यांच्याच कर्मभूमीत त्यांच्याच नावाने विभूषित झालेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा वटवृक्ष विस्तारला आहे. या विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीसाठी विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन महिन्यात आपल्या सरकारने जवळपास 450 नवीन निर्णय घेतले असून अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यात प्राध्यापकांनाही न्याय मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुल, अध्यासन केंद्र संकुल, प्रवेशद्वार सुशोभिकरण, विद्यापीठ नामांतर लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्यांचे शहीद स्मारक, विद्यार्थी वसतिगृह आदी कामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी यासोबतच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती होण्याची अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे आणि नीता पानसरे यांनी केले. महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती करणारे नरेंद्र सोळुंके आणि उभारणीत योगदान देणारे अतुल निकम यांचा सत्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.










































































