Last Updated on 07 Sep 2022 11:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit

सांगली । विनोद मोहिते
इस्लामपूर नगरपालिकेने काढलेला भंगार चा ई लिलाव यशस्वी झाला आहे. नगरपालिकेने निर्धारित केलेल्या रकमेच्या सुमारे सव्वा दोन पट रक्कम पालिकेला या लिलावातून मिळाली आहे. सांगली जिल्ह्यात पालिकास्तरावर अशा प्रकारचा ई लिलाव प्रथमच यशस्वीपणे पार पडला. इस्लामपूर नगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल ३० लाख रुपयांचे उत्पन्न जमा होत आहे.
आज बुधवारी पालिकेच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वैभव साबळे म्हणाले, पालिकेने काढलेल्या भंगार ई लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला. पालिका स्तरावर हा पहिलाच यशस्वी ई लिलाव आहे. निरुपयोगी वस्तू लवकरात लवकर हातावेगळ्या करण्यासाठी हा प्रयोग केला. वाहन विभाग, विद्युत विभाग यांच्याकडील वस्तू, शहरातील पडीक असलेले पोल्स अतिक्रमण व विद्रूपीकरणास कारणीभूत ठरत होते व पुन्हा वापरत न आणता येणारे होते, याबरोबरच अतिक्रमण मोहिमेतून जप्त केलेले जे साहित्य होते. या सगळ्यांचा ई लिलाव काढला होता. आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाकडून शासकीय मूल्यांकन केले होते. तर काही कोटेशन मागवले होते. याची पडताळणी करून मूलभूत रक्कम निर्धारित करण्यात आली.
केवळ फॉर्म फीमधून नगरपालिकेला सव्वा लाख रुपये मिळाले आहेत. लिलावात ३२ वाहनांचा ९ लाख ७० हजारांचा निर्धारित आकडा १६ लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचला. इलेक्ट्रिक विभागातील २८ लिलावांसाठी एक लाख ९८ हजार ३८३ रक्कम निश्चित केली होती. त्याचा लिलाव ६ लाख ३५ हजार ८५२ वर पोहोचला. एकूण २९ पोल होते, त्यासाठी एक लाख २ हजार २९८ रुपये निर्धारित केले होते. हा लिलाव तीन लाख २२ हजार २५८ रुपयांवर पोहोचला. तसेच अतिक्रमणातील २७ वस्तूंच्या लिलावासाठी ५३ हजार ३८३ रक्कम निर्धारित केली होती. या लिलावात २ लाख ४ हजार ३८३ रुपयांची किंमत पालिकेला मिळाली. नगरपालिकेला या लिलावातून चांगली रक्कम मिळाली असून त्यातून मोठी कामे हातात घेता येणार आहेत.पडीक पोल्स निघाल्याने शहराचे विद्रूपीकरण कमी होईल.पाणीपुरवठा तसेच विद्युत पुरवठा या कामासाठी ही रक्कम खर्च करण्याचे ठरवले आहे.










































































