Last Updated on 29 Jul 2022 4:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
आधार क्रमांक संकलनाच्या दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या मोहिमेमध्ये 283-इस्लामपूर व 284-शिराळा (वाळवा तालुका) विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान मतदारांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी व 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याव्दारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहीत करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदारांच्या यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट 2022 पासून 283-इस्लामपूर व 284-शिराळा (वाळवा तालुका) विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान मतदारांकडून आधार क्रमांक संग्रहीत करण्यात येणार आहेत. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आधार संकलनामागील उद्देश आहे.
मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज क्रमांक 6ब भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाबरोबरच ERO NET, GARUDA, NVSP, VHA या ॲपच्या माध्यमावर देखील अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्रमांक 6ब भरून आधार क्रमांक नोंदवून प्रमाणिकरण करता येईल. तसेच मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेटी देवून विद्यमान मतदारांकडून नमुना नं 6ब व्दारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यात येतील. मतदारांनी आधार जमा करणे हे ऐच्छिक आहे.












































































