सांगली |
देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्य विक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषंगीक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमर पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.esram.gov.in/#/user/self या पोर्टलवर संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील इत्यादी माहितीसह मत्स्य कामगारांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती क्षेत्रातील मच्छीमार व मत्स्यमुल्य साखळी इत्यादीमध्ये समाविष्ठ असलेले मत्स्यकामगार यांची वयोमर्यादा 16 ते 59 वर्ष असावी व जे Employees Stay Insurance (ESI) Employees Provident Fund Organisation (EPFO) हे सभासद नाहीत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) व शासन सेवेतील कर्मचारी व आयकर भरणारे नसावे अशी पात्रता आहे.
पोर्टलमध्ये नोंदणी झालेल्या मत्स्यकामगारांना मिळतील पुढीलप्रमाणे लाभ
केंद्र शासनाने असे पोर्टल तयार केले आहे की, ज्यामध्ये असंघटीत मजूर, मच्छीमार, मत्स्यशेतकरी व मत्स्यव्यवसाय अनुषंगीक कामांमध्ये समावेश असलेल्या मजुर इत्यादीची एकत्रित माहिती आधारकार्डशी जोडून अपलोड करण्यात येते. जे कामगार या पोर्टलवर नोंदणी करतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत व्यक्ती मृत झाल्यास 2 लाख रूपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रूपये देण्यात येणे शक्य होईल. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टल मार्फत देण्यात येणे शक्य होईल. या पोर्टलवरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या व राष्ट्रीय महामारी सारख्या परिस्थितीमध्ये सहाय्य करण्यासाठी वापरता येणे शक्य होईल.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला कक्ष क्र. 108, विजयनगर, सांगली मिरज रोड सांगली येथे संपर्क साधावा.