Last Updated on 21 Jul 2022 11:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली होती.राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे.
यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. मतमोजणी आधीच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता.
द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता.कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती.दरम्यान,निवडणुकीत काही खासदार आणि आमदारांनी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचे समोर आले आहे.
द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मते मिळाली.तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मूल्य 1 लाख 45 हजार इतके होते.या दरम्यान पहिल्या फेरीत 15 मते रद्द झाली.
द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मते मिळाली.दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार,छत्तीसगड, गोवा,गुजरात,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली.या फेरीत एकूण 1886 मते वैद ठरली.त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना 1349 मतदान झाले. त्या मताचे मूल्य 483299 इतके आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची मुल्य ही 179876 इतके ठरले.
द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले त्यांचे अभिनंदन

द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्वीट संदेशांच्या मालिकेत ते म्हणाले;
“भारताने इतिहास घडविला! यावेळी 130 कोटी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, पूर्व भारताच्या दुर्गम
भागातील आदिवासी समुदायात जन्मलेल्या भारताच्या या सुकन्येची आपल्या देशाची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे!
या विजयाबद्दल द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन.”
“द्रौपदी मुर्मू यांचे जीवन, लहान वयापासून त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची उत्तम सेवाभावी वृत्ती आणि अनुकरणीय यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहे. देशाच्या नागरिकांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि पददलितांसाठी त्या आशेचा किरण म्हणून उदयाला आल्या आहेत.”
“द्रौपदी मुर्मू यांनी आमदार तसेच खासदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत उत्तम होती.त्या राष्ट्रपती म्हणूनही उत्कृष्ट कार्य करतील आणि भारताच्या विकास यात्रेत आघाडीवर राहून विकासाला अधिक बळकटी देतील.”
“राजकीय पक्षमर्यादांच्या पलीकडचा विचार करून द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठींबा देणाऱ्या सर्व खासदार आणि आमदारांचे मी आभार मानतो. त्यांचा हा विक्रमी विजय आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत शुभशकून ठरणार आहे.”
भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती
| अनु. क्रमांक | राष्ट्रपतीचं नाव | कार्यकाळ |
| 1 | राजेंद्र प्रसाद | 1950-1962 |
| 2 | सर्वपल्ली राधाकृष्णन | 1962-1967 |
| 3 | झाकीर हुसेन | 1967-1969 |
| 4 | व्ही.व्ही.गिरी | 1969-1974 |
| 5 | फखरुद्दीन अली अहमद | 1974-1977 |
| 6 | नीलम संजीव रेड्डी | 1977-1982 |
| 7 | ग्यानी झैल सिंग | 1982-1987 |
| 8 | आर.व्यंकटरमण | 1987-1992 |
| 9 | शंकर दयाळ शर्मा | 1992-1997 |
| 10 | के.आर.नारायणन | 1997-2002 |
| 11 | ए.पी.जे. अब्दुल कलाम | 2002-2007 |
| 12 | प्रतिभाताई पाटील | 2007-2012 |
| 13 | प्रणब मुखर्जी | 2012-2017 |
| 14 | रामनाथ कोविंद | 2017-2022 |
| 15 | द्रौपदी मुर्मु | 2022-2027 पर्यंत |










































































