Last Updated on 31 Mar 2022 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गुढी पाडवा | 2 एप्रिल 2022
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.नूतन संवत्सरारंभ.
ब्रह्मध्वजाय नमः
असे म्हणून गुढीचे पूजन करावे.
ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु॥
या मंत्राने प्रार्थना करून ,नंतर पंचांगारील गणपतीचे पूजन करावे.
या दिवशी घरोघरी गुढ्या उभारुन तोरण बांधून, मंगलस्नान करून देवांची व गुरूची पूजा करावी.
स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून,ज्योतिषांचा सत्कार करून, त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे. मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडूनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून,पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख, विद्या ,आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होते असे म्हटले आहे.
मिरे,हिंग, मीठ ,ओवा व साखर यांच्यासह पुष्पा सईत कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून, रोग शांती होण्याकरता भक्षण करावे असे सांगितले आहे.
पंचांगस्थ गणपतीचे पूजन करून, याचकांना यथाशक्ति दानादिकाना संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते ,वाद्ये व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते असे म्हटले आहे.
वर्षफल श्रवण केले असता पातकांचा नाश होऊन आयुष्य यशलक्ष्मी यांची वृद्धी होते,असे पंचांगात संवत्सर फलामध्ये म्हटले आहे.
गुढीपाढवा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस आहे .पण या दिवशी उपनयन, विवाह ,वास्तुशांती मुहूर्त शास्त्रानुसार करता येत नाहीत मात्र लौकिक गृहप्रवेश साखरपुडा जावळ खरेदी विक्री व्यवसायाचा शुभारंभ इ.गोष्टी करता येतात.
सायंकाळी सूर्यास्तसमयी गुढी हळदी कुंकू लावून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा व गुढी खाली उतरावी. बांधलेल्या साखर माळेचा प्रसाद घ्यावा.
ज्या घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्या घरात या वर्षी गुढी न उभारण्याची प्रथा आहे.ती प्रथा अज्ञानमूलक आहे.
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.













































































