Last Updated on 16 Aug 2024 8:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षक मंडळाने आज वर्ष 2022 साठीच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
पुरस्कारांची घोषणा करण्यापूर्वी फिचर फिल्म श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष राहुल रवैल,कथाबाह्य चित्रपट श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नील पांडा आणि चित्रपटांबाबत सर्वोत्तम लेखन या श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मुदलियार आणि संबंधित परीक्षकांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी सादर केली. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि सहसचिव (चित्रपट), वृंदा देसाई हेही उपस्थित होते.
परीक्षक मंडळामध्ये भारतीय चित्रपट विश्वातील प्रख्यात चित्रपटकर्मींचा समावेश होता. माहिती आणि प्रसारण सहसचिव (चित्रपट) वृंदा देसाई,यांच्या उपस्थितीत फिचर फिल्म श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष राहुल रवैल,कथाबाह्य चित्रपट श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष डॉ.नील पांडा आणि चित्रपटांबाबत सर्वोत्तम लेखन या श्रेणीतील परीक्षक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मुदलियार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार आनंद एकार्शी दिग्दर्शित अट्टम (द प्ले) या चित्रपटाला जाहीर झाला.तर सिद्धांत सरीन दिग्दर्शित आयेना सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट ठरला.
चित्रपटावरील सर्वोत्तम पुस्तक अनिरुद्ध भट्टाचार्जी आणि पार्थिव धर लिखित किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी, या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

मनोरंजनपर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘कांतारा’चित्रपटाची निवड झाली.
कांतारा चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेसाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर थिरुचित्रंबलम चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेसाठी नित्या मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.
पवन राज मल्होत्रा यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा तर नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
व्हीएफएक्स सुपरवायझर जयकर अरुद्रा, विरल ठक्कर आणि नीलेश गोरे यांच्यासह अयान मुखर्जी दिग्दर्शित,’ब्रह्मास्त्र पार्ट 1: शिवा’हा एव्हीजीसीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. रौप्य कमळ आणि 2,00,000/- (प्रत्येकी) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्तम कथन/ व्हॉइस ओव्हर पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ मधील निवेदनासाठी सुमंत शिंदे यांना जाहीर झाला आहे. सोहिल वैद्य निर्मित आणि दिग्दर्शित ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला आहे. सर्वोत्तम कला/संस्कृती चित्रपट पुरस्कार सुनील पुराणिक निर्मित व दिग्दर्शित ‘रंग विभोग’ या मंदिर नृत्य परंपरा दर्शवणाऱ्या कन्नड आणि सचिन सूर्यवंशी निर्मित व दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी पटांना विभागून जाहीर झाला आहे.









































































