Last Updated on 15 Nov 2021 9:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे |
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र,उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.ते 100 वर्षांचे होते.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला,प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांना आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले.जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते.पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ‘ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
लहानपणापासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राने मोहविले होते आणि त्यामुळे त्यांनी सारे आयुष्य शिवाजी राजांच्या संदर्भातील इतिहास संशोधनात घालविले.२०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च महाराष्ट्र भूषण तर २०१९ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण सन्मानाने गौरविले गेले होते.
‘जाणता राजा’ नाटकाचे यश
‘जाणता राजा’ हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात गाजलेले नाटक होते.बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक असे विक्रमी प्रयोग झाले आहेत.विशेष म्हणजे हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित करण्यात आले आहे या नाटकामध्ये जवळपास १५० कलावंतांची मोठी फौज काम करते.बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकाशिवाय ललित कादंबरी लेखन केले.‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’,‘राजा शिवछत्रपती’,‘महाराज’,‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’,‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’,‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रसिद्ध झाली आहेत.यातील “राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या ग्रंथाच्या आत्तापर्यंत १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.











































































