Last Updated on 04 Apr 2025 7:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
संपूर्ण जिल्हा पायी फिरु शकता..
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात किती राज्यं, केंद्रशासित प्रदेश, विविध भाषांप्रमाणेच जिल्ह्यांची रचना देखील वेगवेगळी आहे. आपल्या देशात सुमारे ७७० पेक्षा अधिक जिल्हे आहेत. परंतु यापैकी सर्वात लहान जिल्हा कोणता? असा प्रश्न पडल्यास उत्तर आहे – माहे (Mahe).
माहे हा पुडुचेरी (Puducherry) या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असून, फक्त ८.६९ चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ असलेला हा भारताचा सर्वात लहान जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ इतकं लहान आहे की येथे आपण पायी देखील संपूर्ण जिल्हा फिरु शकतो.
विशेष गोष्टी :
भारताचा सर्वात छोटा जिल्हा : ८.६९ चौ. किमी क्षेत्रफळ
पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचा भाग, पण केरळमध्ये स्थित
फ्रेंच वसाहतीचा इतिहास
निसर्गरम्य किनारा आणि वेगळी प्रशासनिक ओळख
बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज
भौगोलिक आणि प्रशासकीय विसंगती
माहे जिल्ह्याची स्थानिकता ही मोठ्या प्रमाणावर गोंधळात टाकणारी असली तरी तीच त्याची खासियत आहे. केरळच्या कन्नूर आणि कोझिकोड जिल्ह्यांच्या मध्ये वसलेला माहे हा प्रशासनात मात्र पुडुचेरीच्या अंतर्गत येतो. त्यामुळे येथे केंद्रशासित प्रदेशाची धोरणं राबवली जातात, जी इतर केरळमधील भागांपेक्षा वेगळी आहेत.
इतिहासाचा फ्रेंच ठसा
माहे हा पूर्वी फ्रेंच वसाहत होता. ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेच्या काळात फ्रेंचांनी काही विशिष्ट भागांवर आपली पकड ठेवली होती. त्यापैकी माहे एक महत्त्वाचा ठिकाण. आजही माहेमध्ये फ्रेंच शैलीतील वास्तुकला, फ्रेंच भाषेचा प्रभाव आणि संस्कृतीचे अंश आढळून येतात. त्यामुळे हा जिल्हा इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही अभ्यासाचा विषय आहे.
कुठे आहे माहे?
माहे जिल्हा केरळ राज्यातील कन्नूर आणि कोझिकोड जिल्ह्यांच्या मध्ये वसलेला आहे. भले तो पुडुचेरीचा भाग असला, तरी पूर्णपणे केरळच्या सीमेमध्ये आहे.
माहिती असणं महत्त्वाचं!
माहे जिल्हा छोटा असला तरीही निसर्गरम्य किनारा, स्वच्छ रस्ते, शांत जीवनशैली, आणि मुक्त मद्यविक्रीचा लाभ यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. काही पर्यटक माहेला “लहानसं गोवा” असंही म्हणतात.आज ज्या गतीने शहरं वाढत आहेत, जिल्ह्यांच्या सीमा बदलत आहेत, त्या वेळी भारतात अशा छोट्याशा पण इतिहास, संस्कृती आणि प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जिल्ह्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.














































































