Last Updated on 28 Aug 2024 2:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । घर, कुटुंब, समाज आणि संबंधच आपल्या जीवन प्रवासामध्ये महिलांनी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला, अन्यायाला प्रतिबंध करायला सज्ज व्हावे, आत्मनिर्भर बनावे; असे आवाहन ॲड. क्रांती पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुले आणि मुली, महिलांसाठी कायदा साक्षरता’ या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ॲड.क्रांती पाटील बोलत होत्या. प्रास्ताविक प्रा.डॉ. एम. व्ही. लोंढे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका ॲड.क्रांती पाटील व ॲड.पूनम हांडे या लाभल्या होत्या. ॲड.क्रांती पाटील यांनी, महिला सुरक्षा कायदा व तरतुदी याबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांचा इशारा
ॲड. पाटील म्हणाल्या, मुलींनी समोरच्या व्यक्तींकडून होणारा स्पर्श, नजर, त्यांचे शब्द याबाबत अधिक सजग राहावे. शंकास्पद वर्तणूक वाटली तर लगेच त्यावर आपले पालक किंवा शिक्षकांकडे दाद मागावी, आपली नावे कुठेही पुढे येत नाहीत असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी पोक्सो कायदा बद्दल माहिती दिली.ॲड.पूनम हांडे यांनी मुलींवर होणारे अत्याचार व त्यावर कायद्याची भूमिका व कायद्याच्या तरतुदी स्पष्ट केल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था, साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. डॉ. अशोक शिंदे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये समाजात घडणाऱ्या अत्यंत गंभीर घटनांबाबत सविस्तर विवेचन केले व विद्यार्थ्यांनी सतर्क राहून प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन केले.
संयोजन डॉ. मंगल लोंढे व प्रा.क्रांती कांबळे यांनी केले. आभार ॲड. प्रियांका झोळे-पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.प्राची कांबळे यांनी केले.












































































