Last Updated on 20 Aug 2023 6:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चांद्रयान-३ चंद्राच्या जवळ; रशियाचे लुना-25 लँडिंगपूर्वीच झाले क्रॅश
Chandrayaan 3 Live Update : चांद्रयान 3 मोहिमेचे लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती फिरत आहे. ISRO ने ट्विट केले की चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग मॅन्युव्हर यशस्वीरित्या केले गेले आहे आणि आता 23 ऑगस्टची वाट पाहत आहे, चांद्रयान ३ चंद्रावर २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी उतरणार आहे,अशी माहिती इस्त्रोने दिली आहे.चांद्रयान-3 सुस्थितीत असून,लँडिंगसाठी विक्रम सज्ज असल्याचंही इस्रोने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत केवळ अमेरिका,रशिया आणि चीनला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आले आहे.
रशियाची लुना-25 मोहीम अयशस्वी
रशियाची चंद्र मोहीम लुना-25 अयशस्वी झाली आहे.रशियाचे अवकाशयान चंद्रावर कोसळल्याची बातमी आहे.तांत्रिक बिघाडामुळे रशियन स्पेस एजन्सीने यापूर्वीच लुना-25 फेल होण्याची शक्यता व्यक्त केली होती.काही तांत्रिक अडचणींमुळे लूना 25 चे लँडर चंद्रावर क्रॅश झाले.यामुळे रशियाचं स्वप्न भंगले आहे.केवळ रशियासाठीच नाही,तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे.
चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता उतरणार
चांद्रयान-3 मिशनचे लँडर मॉड्यूल 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.इस्रोने ही माहिती दिली आहे.याआधी असे सांगण्यात आले होते की लँडर संध्याकाळी 5.45 वाजता चंद्रावर उतरेल पण आता त्यात बदल करण्यात आला आहे.
भारतापूर्वी तीन देशांनी चंद्रावर केले होते सॉफ्ट लँडिंग
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अमेरिका,रशिया आणि चीनला यश आले असले तरी आतापर्यंत कोणत्याही देशाचे अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात उतरलेले नाही.जर भारत यात यशस्वी झाला तर ही कामगिरी करणारा तो पहिला देश ठरेल.अमेरिकेच्या सर्वेअर-1 ने 1966 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.चीनच्या चांग-3 ने पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.त्याच वेळी,सोव्हियत युनियनचे लुना-9 देखील यशस्वीरित्या चंद्रावर उतरले होते.
चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा
चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो.यामुळेच चांद्रयान 3 मोहीम 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग झाल्यानंतर, लँडर विक्रम आपले काम सुरू करेल.
चांद्रयानाच्या लँडिंगचे प्रक्षेपण येथे पाहता येणार
चांद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्ही इस्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.यासोबतच,DD नॅशनल टीव्हीवर देखील याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.सोबतच,इस्रोच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवर देखील हा ऐतिहासिक क्षण लाईव्ह पाहता येणार आहे.










































































