Last Updated on 28 Sep 2023 7:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथनयांचे आज गुरुवारी (वय 98) निधन झाले.देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता.2004 साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना नियुक्त करण्यात आले होते.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात झाला होता.त्यांनी चेन्नईमध्ये एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली होती.
त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मॅगसेसे पुरस्कार देखील मिळाला होता.स्वामीनाथन यांनी 1961 ते 1972 या 11 वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले.तर 1972 ते 1979 या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते. यानंतर पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.1980 ते 82 या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला.1982 ते 88 या 7 वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केले.
दरम्यान, एम.एस. स्वामीनाथन यांनी 1949 मध्ये बटाटा,गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करून कारकीर्द सुरू केली.यानंतर 1960 च्या दशकात जेव्हा भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता ज्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता,तेव्हा स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उच्च उत्पादनाच्या जातीचे बियाणे विकसित केले.यामुळे भारतातील पारंपारिक शेतीपासून बियाणे आणि संबंधित तंत्रांच्या उच्च-उत्पादक वाणांच्या माहिती मिळण्याकडे संक्रमण झाले.त्यामुळे भारतात हरितक्रांती झाली.
स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा तसेच शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारतमातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन देशाचे मोठे नुकसान आहे.
भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला
भारताच्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करतानाही त्यांनी शेतकरी हित जपण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 2004 साली स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2006 मध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या, उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देण्याच्या त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली. डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत संशोधन पोहोचविणारा,भारताच्या हरितक्रांतीचा जनक हरपला
भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ,पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. स्वामिनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरितक्रांतीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करुन घेतले. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ. स्वामीनाथन यांचा सुरुवातीपासूनचं कृषी क्षेत्राकडे विशेष ओढा होता. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी सोडून कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा त्यांनी शोध लावला. केवळ संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर सामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांनी संशोधन पोहोचवले. देशाच्या पहिल्या ‘हरितक्रांती’ कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडले. या हरितक्रांतीने भारताला जगातील अन्नटंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.










































































