Last Updated on 05 Feb 2026 12:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
ऑनलाइन सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने अडीच कोटींहून अधिक व्यक्तींचे आधार कार्ड निष्क्रिय केले आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे आधार कार्ड अॅक्टिव्ह ठेवल्याने ओळख चोरीचा आणि सरकारी योजनांचा गैरवापर होण्याचा धोका वाढू शकतो, असे सरकारने म्हटले आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की आधार ही आज जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली आहे, ज्यामध्ये अंदाजे 1.34 अब्ज अॅक्टिव्ह आधार क्रमांक आहेत. आधार डेटाबेसची अचूकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी UIDAI सतत अनेक पावले उचलत असते.
मंत्र्यांनी संसदेत सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा आधार क्रमांक निष्क्रिय केला नाही तर भविष्यात त्याच्या आधार कार्डचा वापर करुन फसवणूक होऊ शकते.
त्यामुळे UIDAI ने उचलले महत्त्वाचे पाऊल
सायबर गुन्हेगार मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाचा गैरवापर करून सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकतात, बँकिंग फसवणूक करू शकतात आणि इतर बेकायदेशीर कामे करू शकतात असा धोका आहे. त्यामुळे, UIDAI ने आतापर्यंत असे 2.5 कोटींहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत.














































































