Last Updated on 24 Oct 2021 12:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महागाई दररोज वाढत चालली असून धान्य, तेले, इंधन, पेट्रोल डिझेल अश्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा खिसा हलका होतो आहे. मात्र गेल्या १४ वर्षात ग्राहकांच्या खिशाला अजिबात तोशीस न लावणारी एक वस्तू १ डिसेंबर पासून महाग होणार असून तिच्या किंमती १४ वर्षानंतर दुप्पट होणार आहेत. ही वस्तू दुसरी तिसरी नसून रोजच्या वापरात असलेली काडेपेटी आहे.
जिथे आधी काडेपेटी 1 रुपयात मिळत होते, आता ते 2 रुपयात मिळणार आहे.काडेपेटी मेकिंग कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मिळून हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2007 मध्ये काडेपेटीची किंमत 50 पैशांनी वाढवून 1 रुपये करण्यात आली होती.आजपर्यंत त्यात बदल झाला नव्हता. पण काडेपेटी साठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने आता काडेपेटीच्या किंमती वाढविणे भाग पडले आहे.
शिवकाशी ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसतर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार काडेपेटी बनविण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. लाल फोस्फरस, मेण, बाहेरच्या बॉक्स बोर्ड, आतील बॉक्स, कागद, पोटेशियम क्लोरेट, सल्फर यांचा त्यात समावेश आहे. या सर्व मालांचे भाव वाढले आहेत. शिवाय डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.तामिळनाडू मध्ये या व्यवसायात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ४ लाख कर्मचारी असून त्यातील ९० टक्के महिला आहेत.
या कामगारांना रोजगार हमी मध्ये अधिक पैसे मिळतात त्यामुळे काडेपेटी कारखान्यातील काम सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान कारखान्यांना पेलावे लागत आहे.
कच्या मालाच्या किती वाढल्या किमती
रेड फॉस्फरसचा दर ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचला आहे. मेणाची किंमत ५८ रुपयांवरून ८० रुपये झाली आहे. आऊटर बॉक्स बोर्डची किंमत 36 रुपयांवरून 55 रुपये झाली आहे. इनर बॉक्स बोर्डची किंमत ३२ रुपयांवरून ५८ रुपये झाली आहे.याशिवाय कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट, सल्फर सारख्या पदार्थांच्या किमतीतही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.










































































