Last Updated on 19 May 2022 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रताप । मुख्याधिकारी साबळे यांची माहिती
सांगली ।
इस्लामपूर शहरातील काही भागात स्वच्छतेसाठी असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही लोकप्रतिनिधींच्याकडून खासगी कामे लावली जात आहेत.तर स्वच्छता होत नाही म्हणून हेच लोक पालिकेकडे तक्रार करीत आहेत.पालिकेचा पगार घेवून अशी कामे करणाऱ्या सहा कामगारांना पुन्हा कामावर न घेण्याची लेखी नोटीस संबंधित स्वच्छता ठेकेदाराला दिली आहे,अशी माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
मुख्याधिकारी साबळे म्हणाले,शहरातील टकलाईनगर, नेहरूनगर,आनंदनगर या भागात वेळेवर स्वच्छता होत नसल्याची नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. याची पालिकेने सविस्तर माहिती घेतली असता या भागात स्वच्छतेसाठी सहा कामगारांची नेमणूक आहे. मात्र पालिकेत कामाची हजेरी लावून हे कामगार दिवसभर काही लोकप्रतिनिधींच्याकडे खासगी कामाला जात असल्याचे निदर्शनास आले.
गेल्या अनेक दिवसांपासून हा गंभीर प्रकार सुरू होता. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. पालिकेचा पगार घेवून कामावर न येणाऱ्या या कामगारांना पुन्हा कामावर न घेण्याची नोटीस ठेकेदाराला दिली आहे.
ते म्हणाले, काही लोकांकडून या कामगारांना खासगी कामाला लावणे, स्वच्छता करण्यासाठी आले असता स्वच्छता करू न देणे व उलट पालिकेकडेच तक्रारी करणे असे दुहेरी तंत्र वापरले जात आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचा-यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे भरारी पथक नेमण्यात येणार आहे. आपल्या भागात स्वच्छतेसाठी कर्मचारी न आल्यास, स्वच्छतेत खंड पडल्यास नागरिकांनी तातडीने पालिकेकडे तक्रार करावी,असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छतेचा नवीन ठेका…
मुख्याधिकारी वैभव साबळे म्हणाले, १ जूनपासून ३ कोटी ४१ लाखांचा स्वच्छतेचा नवा ठेका देण्यात येणार आहे.ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.मागील वर्षी हा ठेका ३ कोटी ८२ लाखांचा होता.आवश्यक मनुष्यबळ कमी करता स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.












































































