Last Updated on 22 Oct 2021 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चॅनेल्स पाहण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे
नवी दिल्ली :
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सोबत खाद्य तेल सुद्धा प्रचंड महाग झाले आहे. महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे. टीव्ही पाहण्यासाठी आता चॅनेल्ससाठी ५० टक्के जास्त खर्च करावा लागणार आहे. ‘ट्राय’च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढवण्यात येणार आहेत. ही दरवाढ येत्या १ डिसेंबर २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे.
देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी, वायकॉम 18 ने आपल्या काही निवडक चॅनल्सला ट्रायच्या प्रास्ताविक बुके लिस्टमधून बाहेर केले आहे.ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक मूल्य 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले गेले.परंतु ट्रायच्या नवीन दर आदेशात हे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले. अशा स्थितीत चॅनेल्सना त्यांचे बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देऊ करणे खूप खर्चिक ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकमधून काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
35 ते 50 टक्के ज्यादा पैसे स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनल्सच्या दर्शकांसाठी द्यावे लागणार आहे. सध्या या चॅनल्ससाठी 49 रुपये प्रति महिना द्यावे लागत आहे. परंतु दर वाढवल्यानंतर त्यासाठी 69 रुपये प्रति महिना पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. याच प्रकारे सोनीसाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये, तर झी चॅनलसाठी 39 व्यतिरिक्त 49 रुपये, वायकॉम18 साठी 25 रुपये प्रति महिनाऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.
ट्रायने नवे टॅरिफ ऑर्डर लागू केल्यामुळे टीव्ही पाहणे महागणार आहे. मार्च 2017 मध्ये ट्रायने टीव्ही चॅनल्सच्या किंमतीबद्दल न्यू टॅरिफ ऑर्डर (NTO) जाहीर केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, NTO 2.0 दर्शकांना फक्त असे चॅनल्स दाखवेल, जे तुम्ही निवडले, त्याचेच पैसे मोजावे लागत आहेत.














































































