Last Updated on 14 Jan 2025 8:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी सायंकाळी कीर्तनाचे आयोजन
यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील १०१ किर्तनकारांचा होणार सन्मान
सांगली : वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्य तिथी निमित्त शुक्रवार दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.विशाल खोले महाराज (मुक्ताईनगर) यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील १०१ किर्तनकारांचा माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्व.बापूंच्या पुतळा परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या कीर्तन सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील केले आहे.
आपल्या राज्याला महान संतांची मोठी परंपरा आहे. आपल्या संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करीत समाजा ला आध्यात्माची गोडी लावली आहे,ती वाढविली आहे. संतांच्या परंपरेला उजाळा देत नव्या पिढीची अध्यात्माची गोडी वाढविण्यासाठी आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
माजी मंत्री आणि सुप्रसिध्द वक्ते प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यक्षेत्रातील १०१ किर्तनकारांचा सन्मान केला जाईल. हा सोहळा स्व.बापूंच्या पुतळा परिसरात सायंकाळी ५ वाजता संपन्न होईल. यानंतर
ह.भ.प.विशाल खोले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होईल.
स्व.बापूंच्या पुतळ्याचे पूजन आणि व्याख्याने
दरम्यान सकाळी ७.३० वाजता माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले जाईल. यावेळी शिव व्याख्याते प्रशांत देशमुख (रायगड) यांचे ‘आजच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ‘या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी स्व.बापूंच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवना त काम केलेले अँड.बाबासाहेब मुळीक (विटा) हे स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्यासह कारखान्याचे संचालक व अधिकारी या सोहळ्याचे जोरदार नियोजन करीत आहेत.











































































