Last Updated on 07 Nov 2024 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भडकंबेच्या माळावर सभासदांच्या मालकीचा कारखाना व्हावा, असे स्व.एन.डी.पाटील यांचे स्वप्न होते. त्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करून सभासदत्व घेतलं. परंतु हा साखर कारखाना निर्मिती होऊ नये याचा प्रयत्न कोणी केला, हे येथील जनतेला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या विकासाच्या व तरुणांच्या रोजगार निर्मिती आड येणार्या प्रवृत्तीला या निवडणुकीत परिवर्तन करून धडा शिकवा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, भडकंबे येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, देशातील इंग्रजांची सत्ता घालवण्याचे काम वाळवा तालुक्यातील जनतेने केलं होतं. आता इस्लामपूर मतदार संघाच्या आमदारांची हुकूमशाही पध्दतीची सत्ता घालवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. त्यांनी जनतेला जाणूनबुजून विकासापासून वंचित ठेवले. मी महायुती सरकारच्या माध्यमातून गट-तट न बघता विकास केला. गावा-गावातील पाणंद रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. परंतु आमदारांच्या सांगण्यावरून भडकंबे गावातील सत्ताधाऱ्यांनी या कामाचा प्रस्ताव दिला नाही. परिणामी प्रस्तावासाठी येथील लोकांना आंदोलन करण्याची वेळ आली. हे येथील लोकांचे दुर्देव आहे. आपल्या आमदार पदाला शह मिळू नये म्हणून त्यांनी कोरेगावमध्ये चार-चार गट निर्माण केले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी गावा-गावात, घरा-घरात भांडणे लावण्याचे काम केले. तुमच्या गावातील अंतर्गत रस्ते होत नसतील तर ३५ वर्षे आमदारांना निवडून देऊन काय उपयोग तुमचा झाला, याचा विचार करा आणि परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – जयंत पाटील यांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील
काय तुमचे साहेब….
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील लोक आजून आमदारांच्या दहशतीखाली आहेत. देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला. तेव्हाच गोरा साहेब गेला. ही लोकशाही आहे. अजून ही लोक आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांना घाबरतात. मला आतून पाठींबा देत आहेत. असला पाठींबा आपलेला नको आहे. तुम्ही आजून किती दिवस पारतंत्र्यात राहणार आहात. यातून बाहेर पडा व परिवर्तनाच्या बाजूने उभे रहा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी जबाबदारी असेल,असेही निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.












































































