Last Updated on 12 Dec 2023 10:34 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगलीच्या दत्त इंडियाने सोमवारी रात्री दराची कोंडी फोडली.त्यामुळे अन्य कारखान्यांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान,दालमिया कारखान्यावर आज,मंगळवारी काटा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.तर सोनहिरा कारखान्यावर करण्यात येणाऱ्या आंदोलनाची तारीख आज ठरविण्यात येणार आहे.
गेल्यावर्षीच्या उसाचे शंभर रुपये आणि यंदा उसाची पहिली उचल एफआरपी अधिक 100 रुपये देण्यास जिल्ह्यातील कारखानदारांनी सोमवारी नकार दिला.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कारखान्यांचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरची घेतलेली बैठक सोमवारी निष्फळ ठरली.पण,दत्त इंडियाने सोमवारीरात्री दराची कोंडी फोडली.त्यामुळे अन्य कारखान्यांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील कारखान्यांच्या अध्यक्षांची तातडीने ऑनलाईन बैठक बोलावली.कोल्हापूरचा पॅटर्न सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मान्य करावा,अशी मागणी या बैठकीत शेट्टी यांनी केली, बहुसंख्य कारखान्यांच्या प्रतिनिधीनी त्यांची मागणी फेटाळली.जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा बराचवेळ प्रयत्न केला,मात्र सर्वजण आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांची ऑनलाईन बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला केवळ वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील हजर होते.इतर कारखान्यांच्या अध्यक्षांनी दांडी मारली.इतर कारखान्यांचे कार्यकारी संचालक,प्रतिनिधी उपस्थित होते.त्यामुळे शेट्टी यांनी त्यांचा निषेध केला.
हेही वाचा – अखेर दत्त इंडिया कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली
जोपर्यंत मागणी मान्य होत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असे स्वाभिमानीकडून सांगण्यात आले.दालमिया कारखान्यावर मंगळवारी काटा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.राजू शेट्टींसह महेश खराडे,संदीप राजोबा,जिल्हाध्यक्ष पोपट मोरे,भागवत जाधव,संजय बेले,बाबासाहेब सांद्रे,सुनील फराटे,राम पाटील,मानसिंगराव पाटील,देवेंद्र धस,शिवलिंग शेटे यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.तसेच सोनहिरा कारखान्यावर करण्यात येणाऱ्या आंदोलनाची तारीख आज ठरविण्यात येणार आहे.












































































