Last Updated on 15 Aug 2023 5:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
मुंबई | महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबद्ध होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे. या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
गेल्या पाच वर्षात देशातील साडेतेरा कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची. केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.
शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय
‘शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो. त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर
शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू
असल्याचे सांगितले .
शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.
18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी ‘लेक लाडकी’ सारखी योजना सुरू केली.
दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.
वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.
सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.
दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजे आमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

पुणे | भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते येथील विधानभवनात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
अमृत काळातील स्वातंत्र्य दिन सन्मानाची, अभिमानाची भावना निर्माण करणारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर | अमृत काळातील स्वातंत्र्य दिन हा सन्मानाची व अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव केला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार, अमृत महाआवास अभियान पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच मध्यवर्ती कारागृहातील उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदानाबद्दल स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यादवराव देवगडे, भारत छोडो आंदोलनात सहभागाबद्दल बसंतकुमार चौरसिया, महादेव कामडी, नारायण मेश्राम, काशिनाथ विठोबा डेकाटे आदी स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विशेष गौरव करून त्यांच्यासोबत संवाद साधला.
अहिल्याबाई होळकर गौरव पुरस्कार
महिला व बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार दिल्या जातो. जिल्ह्यातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या डॅा. रेखा बाराहाते (२०१५-१६), प्रा.डॅा.प्रेमा चोपडे-लेकुरवाडे (२०१६-१७), डॅा. नंदा भुरे (२०१७-२०१८), ॲड सुरेखा बोरकुटे (२०१८-१९), ॲड स्मिता सरोदे –सिंगलकर (२०१९-२०), डॅा. लता देशमुख (सन २०१३-१४), जयश्री पेंढारकर (२०१४-१५) यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमृत महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल पंचायत समिती सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच क्लस्टरमधील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रथम आलेल्या पंचायत समिती रामटेक, द्वितीय पंचायत समिती पारशिवनी. राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम आलेल्या पंचायत समिती कळमेश्वर, द्वितीय आलेल्या पंचायत समिती कुही येथील गटविकास अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या घटकांतर्गत बोथीयापालोरा ता. रामटेक या ग्रामपंचायतीला प्रथम तर द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत कोलीतमारा ता.पारशिवनी. राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत बोरी ता. रामटेक, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत निमजी ता. कळमेश्वर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम पुरस्कार सागर वानखेडे ता. रामटेक यांना तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार मनोहर जाधव ता. पारशिवनी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मध्यवर्ती कारागृहातील उत्कृष्ट सेवा बजावलेल्या सुभेदार किशोरीलाल सुकराम रहांगडाले आणि किशोर पडाळ यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
इस्त्रोच्या ‘स्पेस ऑन व्हिल्स’चे उद्घाटन
भारतीय अंतराळ प्रवासाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी स्पेस ऑन व्हिल्स ही बस असून या बसचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
विदर्भाच्या विविध भागात ही बस जाणार असून विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमांची व आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती देणार आहे. नागपुरातून निघून ही बस वर्धा येथे पोहोचेल. या बसमध्ये चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास पहायला मिळणार आहे.
राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडविलेल्या ऐतिहासिक, अध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांसह प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन जिल्ह्यातील दुधगंगा धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच क्रीडा विषयक माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी प्राणाचं बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, वीरांना, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या महाराष्ट्रवीरांना व त्यांच्या कुटुंबियांना वंदन करुन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, महाराणी ताराबाईंच्या त्याग, शौर्य, कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर नगरीत स्वातंत्र्य दिनी ध्वरारोहण करण्याचा मान मिळाला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
स्वातंत्र्य वीरांच्या त्यागातून, बलिदानातून देशाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच सैन्यदल, निमलष्करी दल, पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली आहे. अनेक कठीण परिस्थितीला सामोरं जात 76 वर्षे हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं आहे. यापुढेही देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आपण सर्वांनी मिळून टिकवणं महत्त्वाचं आहे. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातल्या नागरिकांचे व त्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाचे आहे.
देशानं गेल्या 76 वर्षात खूप प्रगती केली. या प्रगतीचं श्रेयं, देशातल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, त्या मेहनतीला आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटनेनं देशाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानामुळं आपण इथपर्यंत पोहचलो आहोत. देशासह राज्यात कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं, निर्धारानं लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना त्यांनी धन्यवाद दिले. विविधतेत एकता ही आपल्या भारत देशाची खरी ओळख आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप 10’ अर्थव्यवस्थांमधून ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. भारताचा ‘जीडीपी’ दर सहा ते सात टक्यांच्या सध्याच्या सरासरीने वाढत राहिला तर लवकरच आपण जर्मनी आणि जपानला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या परिश्रम आणि योगदानाच्या जोरावर हा टप्पा आपण निश्चित गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ या संकल्पनेवर यावर्षी आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. यानुसार देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी देशात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’, ग्रामसभा, पंचप्रण प्रतिज्ञा, शिलाफलक अनावरण, वृक्षारोपण, वीरांना वंदन असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांच्या कल्याणाच्या अनेक योजनांसाठी 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी 4 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडूनही 500 रुपये प्रती महिना देण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्वसमावेशक विमा योजनेनुसार अवघ्या एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत आहे. याचा लाभ राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात वेळेत कर्ज परतफेड करण्यात आणि वेळेत वीज बिल भरण्यामध्येही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याबद्दल कोल्हापूरकरांचे कौतुक करुन नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सर्वांनी मिळून समन्वयाने सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपयांवरुन दीड हजार रुपये अनुदान करण्यात आले आहे. या याजनेतल्या लाभार्थ्यांना वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना राज्यात 700 ठिकाणी सुरु केली आहे. या माध्यमातून 7 लाख 43 हजार 570 रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रित करून आता सर्वांनाच पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनातही भरीव वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासात सरसकट 50 टक्के, 65 ते 75 वर्षामधील लोकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात आले. यामुळे सामान्य नागरिकांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होऊन गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय राजमार्ग क्र.166 वरील ‘आंबा ते पैजारवाडी’, ‘पैजारवाडी ते चोकाक’ पर्यंतच्या चौपदरीकरणासह अन्य मार्गांचेही काम सुरु असल्याचे सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी त्यांच्या हस्ते वीरपत्नी श्रीमती पद्मा प्रशांत जाधव व अपंग सेवारत सैनिक अक्षय नंदकुमार केंगरे यांना ताम्रपट वितरण करण्यात आले.
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2019-20 साठी अश्विनी मळगे- वेटलिफ्टींगमध्ये तर कु. आरती पाटील- बॅडमिंटन दिव्यांग खेळाडू. सन 2020-21 साठी कु. सोनल सावंत- पॉवरलिफ्टींग, कु. स्वाती शिंदे- कुस्ती, कु. अभिज्ञा पाटील- नेमबाजी, श्रीमती स्वप्नाली वायदंडे – सॉफ्टबॉल तर दिपक पाटील यांना जलतरण दिव्यांग खेळाडू म्हणून पुरस्कार वितरण करण्यात आला.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना उत्तम जीवरक्षक पदकाने गौरवण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) सन 2022-23 साठी प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह विभागाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित करण्यात आले. यामध्ये तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर, सुभेदार रुपेंद्र कुंभार, कारागृह शिपाई रुपेंद्र कोळी, इजाज शेख, श्रीधर कुंभार विद्या ढेंबरे यांना गौरवण्यात आले.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सी.पी.आर. रुग्णालय व गंगा प्रकाश हॉस्पिटल या रुग्णालयांना तसेच विभागीय व्यवस्थापक किरण कुंडलकर, जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुंबे व डॉ. रेणुका वेदुलेकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात मधाचे गाव, मधमाशी मित्र, रेशीम ग्राम व स्टार्टअप यात्रा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांना गौरविण्यात आले.
शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. इयत्ता 5 वी ग्रामीण विभागामध्ये आजरा तालुक्यातील वि.मं.सुळगाव शाळेचा विद्यार्थी बुशरा मुल्ला, राधानगरी तालुक्यातील केंद्र शाळा गुडाळचा विद्यार्थी विराजराजे मोहिते. इयत्ता 5 वी शहरी विभागामध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा भालेकर तर लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील विद्यार्थिनी शौर्या पाटील. इयत्ता 8 वी ग्रामीण विभागातील भुदरगड तालुक्यातील प.बा.पाटील हायस्कूल, मुदाळचा विद्यार्थी पार्थ पांडूरंग पाटील, संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथील विद्यार्थी चैतन्य धोनुक्षे. इयत्ता 8 वी शहरी विभागातील म.न.पा. इचलकरंजीमधील तात्यासो मुसळे विद्यालय येथील विद्यार्थिनी श्रध्दा कामते व डी.के.टी.ई हायस्कूलमधील विद्यार्थिनी आर्या कामीरे यांना गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण
मुंबई | भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई | भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण झाले.
यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. तसेच शहिदांच्या वीरपत्नींचा यावेळी जिल्हाधिकारी यांनी सन्मान केला.जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी शहीद वीरचक्र प्राप्त स्कॉड्रन लीडर परवेझ रुस्तम जमास़्जी (वायुसेना) यांच्या वीरपत्नी झारीन जमास़्जी, शौर्यचक्र प्राप्त स्कॉड्रन लीडर मनोहर राणे (वायुसेना) यांच्या वीरपत्नी माधवी राणे, शहीद लान्स नायक दिपक धोंडू गावडे (भूदल) यांच्या वीरपत्नी वंदना गावडे यांचा सन्मान केला. तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट काम केलेले डॉ. आर. कूपर हॉस्पिटल, मुक्ता किडनी अँड डायलिसिस सेंटर, के. ई. एम. हॉस्पिटल परळ, जे.एस. ओ. अँड जागर, मेडिकलच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान पत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, एकनाथ नवले, अभिजित घोरपडे , रवींद्र राजपूत, तहसीलदार आदेश डफळ, तहसीलदार प्रियांका ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई | स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई | भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी माजी न्यायाधीश आणि अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

नवी दिल्ली | भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, निवासी अभियंता जे.डी. गंगावार, उप अभियंता (विद्युत) आशुतोष द्विवेदी, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम, तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान, राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. देशभरातून विविध क्षेत्रातील 1800 लोक या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाले.स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा | सातारा शूरवीरांचा, क्रातिकारकांचा देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा जिल्हा आहे. निसर्ग संपन्नता आणि वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून विकास प्रक्रीया गतीमान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते. ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेखर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारी लढे आणि स्वातंत्र्यानंतर विकासाभिमुख राजकरण या सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र असून जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचे स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी व आतापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांमुळे राज्यातच नव्हे तर देशात सातारा जिल्ह्याचा नावलौकीक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यामध्ये कृषि, पर्यटन इतर विकास कामांचा समावेश आहे. पर्यटन आराखड्या नुसार कोयनेचा भाग, कांदाटी खोऱ्यातील असे एकूण ८५ कि.मी. परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे आर्थिक उन्नती बरोबर दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे. हा आराखडा तात्काळ पर्यटन व सांस्कृतीक विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४०० आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रें निर्माण करण्यात येणार आहेत. शहरामधील खासगी हॉस्पिटल असतात त्याच प्रकारे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार आहेत. डोंगर दऱ्यातील वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी डोंगरी विकास आराखडा सादर केला असून त्याध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात येईल.
सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारु लागू नये, सहज शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पाटण तालुक्यात करण्यात आला. आतापर्यंत या योजनेंतर्गत साडेचार लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
एक रुपयांमध्ये पिका विमा हा एक ऐतिहासिक शासनाने निर्णय घेतला आहे. याचा जिलह्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रयत्न करीत असून याला केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत. तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्व साखर कारखान्यांना मिळून १० हजार कोटींचा आयकर भरावा लागला असता तो केंद्र सरकारने माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे याबद्दल त्यांनी केंद्राचे विशेष आभार मानले
पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार
आर्चरी या खेळात एकाच हंगामात दोन आंतरराष्ट्रीय विश्वजितेपद प्राप्त केलेल्या कुमारी अदिती स्वामी तसेच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी घवघवीत यश संपादन केल्याद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शहीद जवान सुरज शेळके यांची वीरमाता सुवर्णा व वीरपिता प्रताप, शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्या विरपत्नी रेश्मा यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते तम्रपटांचे वितरण करण्यात आले.







































































