Last Updated on 06 Sep 2024 5:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या ३५ वर्षांत मतदार संघाचा विकास खुंटला आहे. आता आम्ही भाजपा व महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत. त्यांनी स्वतः कामे मंजूर करून आणून श्रेय लाटावे, असा सल्ला भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील व सरचिटणीस संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आ.जयंत पाटील यांना दिला.
निवास पाटील म्हणाले, भाजपा व महायुती केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे होत आहेत. तुंग गावात असणारे मारुती मंदिर हे पुरातन काळातील असून या तिर्थक्षेत्रास हजारो भाविक भेट देत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिर परिसराचा विकास व सुशोभीकरण झालेले नाही. याकामी निधी मिळावा म्हणून अनेक वर्षे विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे येथील नागरिक मागणी करत होते. परंतु त्यांनी या मागणीकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शेवटी नागरिकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांची भेट घेऊन मंदिर सुशोभीकरण कामास निधी मंजूर करून आणून देण्याची मागणी केली.
दादांनी तात्काळ दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तीर्थक्षेत्र ब वर्ग अंतर्गत तुंग येथील श्री हनुमान मंदिर परिसरातील काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, गटार व परिसर सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधीची मागणी केली होती. ना. खाडे यांनी याबाबत दखल घेऊन दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यटन, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधींबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर ना.खाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्यामार्फत ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मुंबई यांच्याकडे दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्ताव दाखल केला होता.
त्यानंतर निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या पाठपुराव्यामुळे व ना.सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनातून ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी ४ कोटी ९९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय आ.जयंत पाटील घेत आहेत. यांनी तसे न करता स्वतः कामे मंजूर करून आणून श्रेय लाटावे.
संदीप सावंत म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या ३५ वर्षांत मतदार संघाचा विकास खुंटला आहे. परंतु आता आमचे नेते निशिकांत भोसले पाटील -पाटील (दादा) यांच्या प्रयत्नातून मतदार संघाचा कायापालट होत आहे. दादांच्या प्रयत्नातून पाणंद रस्ते, गटारी, पाणी योजना, गावातील अंतर्गत रस्ते, मंदिरे सुशोभीकरण यासह आदी कामांसाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे. त्या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागल्याने ते आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत.
यावेळी शहर अध्यक्ष अशोकराव खोत, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले-पाटील, निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील, गजानन पाटील, सरचिटणीस यदुराज थोरात, वाहिद मुजावर, प्रमोद डांगे, प्रवीण परीट, विश्वजीत पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
निशिकांतदादांकडून इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचा कायापालट…
आमदार किंवा मंत्रिपद नसतानाही दादांनी कोट्यवधी रुपयांचा मोठा निधी खेचून आणून मतदार संघाचा विकास साधल्याने आ.जयंत पाटील यांच्या पायाखालची वाळू सरखु लागली आहे. त्यामुळे आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे ते श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. या मंदिर सुशिभिकरण निधीसाठी कोणी पाठपुरावा केला, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे यापुढे आ.जयंत पाटील यांनी असला लबाड लांडग्याचा धंदा बंद करावा, असा टोला यावेळी भाजपा पदाधिकऱ्यांनी लगावला.









































































