Last Updated on 21 Aug 2024 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा
‘लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडका शेतकरी’ अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
परळी वैजनाथ । महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना समर्पित ‘लाडका शेतकरी’ अभियानाची आज येथे भव्य सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा केली.
पाच दिवसीय कृषी महोत्सव २०२४ च्या उद्घाटनाच्या या शुभारंभप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता एनडीआरएफच्या निकषांना बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. गतवर्षीच्या सोयाबीन आणि कापूस पिकांना मिळालेल्या कमी दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आल्या होत्या, परंतु आता सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून आता सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला.
तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेबपोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या कॉफी टेबल बुक आणि परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.









































































