Last Updated on 12 May 2023 4:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील दीड हजार युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण पुणे येथे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 मे असून पात्र विद्यार्थ्यांनी mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. तसेच संस्थेच्या 0712-2870120/21 या क्रमांकावर संपक करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या दीड हजार ठेवण्यात आली असून प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.
यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन, अनिवासी पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 12 वी उत्तीर्ण व वैद्यकीय अर्हता पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचे श्री. खवले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.









































































