Last Updated on 02 Oct 2023 9:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सध्या साधनं जपली जात असून माणसं वापरली जात आहेत.प्रेम,जिव्हाळा कमी होत चालला असून माणसांचे जीवन यंत्रवत होत चालले आहे.तुम्हाला सुखी व्हायचे असेल,तर माणसं जपा आणि साधने वापरा.अहंकार,मीपणा सोडा. नाती जपा,मस्त जगा,असा संदेश प्रसिध्द युवा वक्ते गणेश शिंदे पिपरी चिंचवड यांनी राजारामनगर येथील व्याख्यानात बोलताना दिला. श्री.शिंदे हे नात्यांचा गोडवा,विशेषतः बापाचे मुलीवर असणारे प्रेम सांगताना उपस्थित अनेक महिला व पुरुषांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या..
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,जिमखाना समितीचे अध्यक्ष दादासो मोरे,कामगार नेते शंकरराव भोसले, सांस्कृतिक मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटसुते,खजिनदार संजय सत्रे,समाजभूषण सचिन पाटील,पत्रकार विनोद मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री.शिंदे पुढे म्हणाले,व्यक्तीपेक्षा संस्था मोठी आहे.आपण जे काम करता,ते आनंद घेत करा.आपली दुसऱ्याशी तुलना करू नका.तुमचे वेगळेपण ओळखा आणि ते जपा.अहंकार,मीपणा हा सर्वात मोठा शत्रू आहे.तुम्ही तुमच्या कुटुंबियाबरोबर जितका वेळ घालविता त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही संस्थेत,कारखान्यात एकत्र असता.एकमेकास समजून घेत पुढे जावा.ताण तणावाचे ओझे एकाकडून दुसऱ्याकडे ढकलू नका.ताण-तणावाचे योग्य नियंत्रण करा.तुम्हाला खरंच सुखी व्हायचे आहे,का तुम्ही सुखी असल्याचे दुसऱ्यांना दाखवायचे आहे? हे एकदा ठरवा.या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. मावशी-आत्या,काका-चुलता,मामा- मामी,आजी-आजोबा आदी नात्यांचा गोडवा चाखलेली कदाचित ही शेवटची पिढी ठरेल.
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,सेक्रेटरी डी.एम.पाटील,चिफ इंजिनिअर विजय मोरे,चिफ केमिस्ट सुनिल सावंत,कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,एचआर मॅनेंजर अनिल पाटील, जे.बी.पाटील,संजय गुरव,रमेश बोराळकर यांच्यासह खाते प्रमुख,कामगार व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































