Last Updated on 08 Jul 2023 1:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपचार नको पण आजार परवडला म्हणण्याची रुग्णांवर वेळ : कट-प्रॅक्टीसच्या माध्यमातून काहींचे 50 टक्के लाभाचे धोरण !
🌑 काही हॉस्पिटलमधील रक्त-लघवी चाचणी प्रयोगशाळा सध्या चांगल्याच चर्चेत
🌑 काही हॉस्पिटलमधून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी
🌑 काही प्रयोगशाळांमध्येही कट-प्रॅक्टीसचा धंदा चांगलाच तेजीत
🌑 शासनाचे निकष धाब्यावर बसवून रक्त-लघवी चाचणी प्रयोगशाळा सुरू
🌑 रुग्णसेवेपेक्षा अशा प्रयोगशाळांमध्ये बाजारीकरणाला अधिक महत्त्व
🌑 किमान वैद्यकीय पात्रता नसणारे युवक-युवती लॅब चालवत असल्याचे चित्र
🌑 नातेवाईकांना आर्थिक कात्री लावून त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा![]()
Pathology lab : कोणत्याही आजाराचे निदान करणाऱ्यामध्ये पॅथालॉजी लॅबची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.पॅथालॉजी ही वैद्यकशास्त्राची विशेष शाखा आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या कायद्यानुसार पॅथाल़ॉजीचा समावेश हा वैद्यकीय व्यवसायामध्ये होतो.रक्तनिदान तसेच अन्य आजारांच्या चाचण्यांसाठी शहरांमध्ये असलेल्या या पॅथालॉजी लॅबचे प्रमाण वेगाने वाढते आहे.या लॅब कुणी चालवाव्यात,त्यावर नियंत्रण कुणाचे असावे,यासंदर्भात असलेले निकष मात्र काटेकोरपणे पाळले जात नाही हेही तितकेच खरे !
सर्वसामान्यांची जीवनशैली जसजशी बदलत गेली तसतसे आजारांचे स्वरुपही झपाट्याने बदलले.या आजारांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेले निदान हीच एकमेव बाब महत्त्वाची राहिली नाही.तर रुग्णांनाही निदान चाचण्यांची खात्री महत्त्वाची वाटू लागली.त्यामुळे साथीच्या आजारांपासून संसर्गजन्य आजारांच्या उपचारपद्धतीमध्ये निदान चाचण्या महत्त्वाच्या ठरु लागल्या.
मात्र,राज्यातील काही हॉस्पिटलमधील रक्त-लघवी चाचणी प्रयोगशाळा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.काही प्रयोगशाळांमध्ये दिल्या गेलेल्या चुकीच्या ‘रिपोर्ट’मुळे काहींना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे चर्चेत आहेत.काही हॉस्पिटलमधून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी केली जात असल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.उपचार नको पण आजार परवडला म्हणण्याची वेळ रुग्णांवर येवू लागली आहे.काही प्रयोगशाळांमध्येही कट-प्रॅक्टीसचा धंदा चांगलाच तेजीत आला आहे.
राज्यातील काही शहरे दिवसेंदिवस विस्तारित होत आहेत.त्यातच अनेक अत्याधुनिक सुविधाही अशा शहरातून उपलब्ध होताना दिसत आहेत.शैक्षणिक, सामाजिक,राजकीय अशा विविध आघाड्यांवर शहरांचा अधिकाधिक विकास होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये बस्तान बसवू लागल्याने शहरांची लोकसंख्याही वाढत आहे.शहरात वैद्यकीय सेवाही तितक्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत.परंतु आरोग्य सेवा वेगवेगळ्या कारणांनी सध्या चांगलीच चर्चेत आहे.
राज्यातील शहरांमधील काही हॉस्पिटलमध्ये मेडीकल स्टोअर्सनंतर आता प्रयोगशाळाही सुरू झाल्या आहेत.शासनाचे निकष धाब्यावर बसवून काही ठिकाणी रक्त-लघवी चाचणी प्रयोगशाळा सुरू असल्याची चर्चाही सातत्याने सुरू आहे.रुग्णसेवेपेक्षा अशा प्रयोगशाळांमध्ये बाजारीकरणाला अधिक महत्त्व आले आहे. प्रयोगशाळेमध्ये पॅथॉलॉजिस्टच्या सहीशिवाय ‘रिपोर्ट’ दिले जावू नयेत,असे सर्क्युलर असताना प्रत्यक्षात मात्र किमान वैद्यकीय पात्रता नसणारे युवक-युवती लॅब चालवत असल्याचे चित्र आहे.अशा लोकांकडून रिपोर्टच्या गुणवत्तेपेक्षा पैशाची क्वाँन्टीटी बघितली जाते.काम मिळविण्यासाठी काही लोक रुग्णांच्या घरी जाऊन रक्त-लघवी तपासण्या करू लागले आहेत.हॉस्पिटल मॅनेजमेंटही यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे.असे प्रयोग आरोग्याला घातक ठरत आहेत. होम सर्व्हीसच्या नावाने पैसे मिळविण्याचा नवा मार्ग काहींनी शोधला आहे.
बिलाच्या नावाखाली मनमानी

काही ठिकाणी स्वतंत्ररित्या सुरू असलेल्या लॅबपेक्षा हॉस्पिटलमधील लॅबमध्ये चाचण्यांचा खर्च मोठा आहे.लॅबोरेटरी बिलाच्या नावाखाली मनमानी बिल आकारणी हॉस्पिटलमधील काही लॅबमध्ये सुरू आहे.काही डॉक्टरांनी लॅबच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा नवा मार्ग शोधला आहे.आधीच वैतागलेल्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना आर्थिक कात्री लावून त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जात आहे. काही हॉस्पिटल बाहेरील लॅबमधून चाचण्या करून घेतात.यामध्ये मोठ्या प्रमाणात कट-प्रॅक्टीसचा धंदा सुरू आहे. कट-प्रॅक्टीसच्या माध्यमातून 50 टक्के लाभाचे धोरण काहींनी सुरू केले आहे.रुग्ण मिळवून द्या आणि 50 टक्के रक्कम घेऊन जा, असा अलिखित करारच काही ठिकाणी रूजू झाला आहे.
काही हॉस्पिटलमधून होणाऱ्या रक्त-लघवी चाचण्या करणारे सक्षम आहेत का,त्याचबरोबर त्यांच्याकडे तसे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का,याबाबत शासकीय आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.आरोग्य विभाग याबाबत गांधारीची भुमिका घेताना दिसत आहे.चुकीच्या व्यक्तीकडून होणाऱ्या रक्त चाचण्या आणि त्याही चुकीच्या पद्धतीने यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
![]()









































































