Last Updated on 05 Feb 2023 2:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
देशात कधीही मनुवाद पूर्ण यशस्वी न झाल्याने आरएसएसचा धसका घेण्याची गरज नाही
सांगली ।
महाराष्ट्र राज्याला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची मोठी परंपरा आहे. मात्र आता केवळ त्यांच्या नावांचा उदघोष करून चालणार नाही. तर सामाजिक संघटनांनी बदलत्या परिस्थितीत नवे विषय घेऊन लोक लढे उभा करायला हवेत,अशी भावना पद्मश्री डॉ.गणेश देवी (धारवाड) यांनी व्यक्त केली.आपण कोण आहोत,आपली कर्तव्ये काय आहेत? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.
वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सत्यशोधक युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते.माजी मंत्री आ.जयंतराव पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ.सुरेखा देवी,कॉ.धनाजी गुरव प्रामुख्याने उपस्थित होते.हे दोन दिवसीय शिबिर घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठानच्या निसर्गरम्य परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.या निवासी प्रशिक्षण शिबिरात वेग-वेगळ्या विषयावर प्रबोधन,व त्यावर विचारमंथन करण्यात आले.
डॉ.देवी पुढे म्हणाले,संविधान वाचवा, संविधान वाचवा असा केवळ टाहो फोडून चालणार नाही.तर संविधानाने निर्माण केलेल्या जिल्हा परिषदेपासून संसदेपर्यंतच्या संस्थांची कार्य पध्दती समजून घ्यायला हवी.आरएसएसचा इतका धसका घेण्याची गरज नाही.कारण आपल्या देशात कधीही मनुवाद पूर्ण यशस्वी झालेला नाही.आपल्या देशात केंद्र व राज्य या दोन सत्ता असल्या,तरी खरे इंजिन नागपूरच्या आरएसएसचे आहे.त्यांची भाषा बदलली असून ते सार्वजनिक विषयावर बोलत आहेत.मुस्लिम व ख्रिश्चन समाजांच्या मुळे देशात लोकसंख्या वाढत असल्याचा प्रचार साफ खोटा आहे.ज्या कुटुंबांला दोन पेक्षा जास्त मुले आहेत,त्यांच्या शासकीय सुविधा बंद करणे,मतदान हक्क रद्द करण्याचे नवे बिल आणण्याचा घाट घातला आहे.त्यामुळे सामान्य माणसांच्या अधिकारावर गदा येणार आहे.
आ.पाटील म्हणाले,देशात घडणाऱ्या घडामोडींचे निरीक्षण करताना आपण कृती काय करणार? हा प्रश्न आहे. काळ बदलले ला आहे.या परिस्थितीत आपण काय करायचे? हे ठरवावे लागेल.दोन धर्मातील मुला-मुलींच्यामध्ये ज्या दुर्घटना होत आहे,त्याचा निषेध करायलाच हवा.मात्र लव्ह जिहादच्या नावाने भावनिक मोर्चे काढून समाजात दरी निर्माण करणे योग्य नाही.देश व राज्यात सत्याचा कायम आग्रह धरणाऱ्या सत्यशोधक चळवळीचे कार्य महान आहे. सांगली-सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे.वाळवा तालुक्यातील क्रांतिकारकांनी हातात बंदुका घेऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि देशाला स्वातंत्र्य मिळविले.ही परंपरा पुढे नेत युवा पिढीपुढे जाज्वल निर्माण करायला हवे.सत्तेत कोणीही असो,मात्र सर्वांना बरोबर घेऊन जायला हवे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवायला हवा.विरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणे,त्यांच्या वर छापे टाकणे,त्यांना त्रास देण्याचा दांडगा वा देशाला घातक आहे.
प्रारंभी दीपक कोठावळे (इस्लामपूर) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अँड.बाबासाहेब मुळीक,बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील,खंडेराव जाधव,अरुण कांबळे,प्रा.अनिल पाटील,सुस्मिता जाधव, रोझा किणीकर,पिरअली पुणेकर,उमेश कुरळपकर,प्रविण पाटील यांच्यासह १०० च्यावर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.प्रा.डॉ.एस.के.माने यांनी आभार मानले. प्रा.डॉ.राजेश दांडगे यांनी सूत्रसंचालन केले.









































































