Last Updated on 11 Jul 2023 6:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । वनमहोत्सव कालावधीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी सवलतीच्या दरात रोपे वाटप करण्यात येत असून या योजनेचा फायदा सर्व संबंधित विभागांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी एच.एस.वाघमोडे यांनी केले आहे.
15 जून ते 30 सप्टेंबर वन महोत्सवाच्या या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा,त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा केला जातो.
या रोपांचे दर 4 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत असून रोपे 9 महिन्यांपासून 18 महिन्यांपुढील पर्यंत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयासांठी हा दर नाम मात्र 1 रुपया राहिल. तसेच 100 पेक्षा जास्त व 500 रोपांपर्यतचा दर 20 ते 40 रूपये प्रतिरोप आहे.
विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा अंतर्गत एकुण 10 परिक्षेत्रामध्ये सन 2023-24 मध्ये एकूण 12 रोपवाटिकांमध्ये एकूण 12.77 लक्ष लहान व उंच रोपे उपलब्ध आहेत.
जांभूळ, बेल, महारुख, आवळा, फणस, पेरू, कढीपत्ता, सावर, सीताफळ, वड, पिंपळ, साग, काजू, बहावा, बेहडा, शेवगा, करंज, लिंबू, रिठा, बकुळ, कडूलिंब, सीता, अशोक, अर्जुन इत्यादी विविध प्रजातीची लहान-मोठे रोपे उपलब्ध आहेत. तरी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.














































































