Last Updated on 27 Feb 2022 10:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारे आरसाच असतो.कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1971 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स).या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क,शेतजमिनीचे हक्क,त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.तसेच यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात.यापैकी ‘गावचा नमुना’ नं 7 आणि ‘गावचा नमुना’ नं 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो.म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
7/12 उतारा हे दर्शवितो
प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. ‘गाव नमुना 7’ हे अधिकारपत्रक आहे व ‘गाव नमुना 12’ हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे ‘गाव नमुने’ असतात.सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. 7/12 हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. 7/12 ची नवीन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात. 7/12 पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते.
असा काढता येईल सातबारा उतारा
आता तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्ट फोनवरून पाच मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढू शकता.त्यामुळे आता तुम्हाला तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची अजिबात गरज पडणार नाही. महाराष्ट्र सरकारचा महसूल विभाग राबवत असलेल्या ई- फेरफार या मोहिमेमुळे आता डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा काढणे सहज सोपे झाले आहे.
✪ डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर http://www.bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ सर्च करायचे आहे.यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सराकरच्या महसूल विभागाची वेबसाईट उघडेल.या वेबसाईटच्या उजव्या बाजूला तुम्हाला डिजिटल सातबारा पाहण्यासाठीचा पर्याय दिसेल.या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ”आपला7/12” नावाचे पेज उघडेल.या वेबसाईटवर जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर तु्म्ही लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून या साईटवरील सेवांचा लाभ घेवू शकता.
✪ पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी इथं आला असेल,तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येईल.
ते कसे तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
✪ त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केले की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.
✪ याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात,ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.
✪ त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
✪ पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.
✪ यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
✪ त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
✪ या पेजवर सगळ्यात खालच्या बाजूला एक सुचना दिली आहे. या सुचनेत प्रत्येत साताबारा काढण्यासाठी 15 रुपये शुल्क लागेल आणि हे पैसे तुमच्या उपलबध्द बॅलन्समधून कापले जाईल. तुम्ही नविन नोंदणी केलेली असल्यामुळे तुमच्या खात्यात बॅलन्स असणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही खाली दिलेला रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करून डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेच बँकींग किंवा भीम युपीआयद्वारे पैसे जमा करू शकतो.
✪ यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर त्याठिकाणी तुमच्या खात्यात तुम्ही जमा केलेली रक्कम दिसेल. यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढण्यासाठी समोर दिलेल्या फॉर्मवर माहिती भरायची आहे.
✪ त्यानंतर तुम्ही दिलेल्या गट नंबरचा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तुमच्या समोर असेल. या सातबाऱ्यावर हा सातबारा कोणत्या तारखेला डिजिटल स्वाक्षरीसह तयार झाला आहे, याची माहिती सातबाऱ्याच्या खालच्या बाजूला दिली असेल. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केला असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज लागणार नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हा सातबारा तुम्ही अधिकृतरित्या वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा साताबारा घर बसल्या काढू शकता.










































































