Last Updated on 07 May 2023 10:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पांतर्गत 7.56 मेगावाट प्रकल्प कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश
नागेवाडी 4.20 मेगावाट, वालेखिंडी 3.36 मेगावाट : 10.6 मेगावाटचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात
नागपूर । रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली.त्यात 7.56 मेगावाटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प नुकतेच कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.त्यामुळे लवकरच राज्यातील 8 गावातील 2,200 शेतकऱ्यांकडे लवकरच सौर कृषी वाहिनीतून वीज पुरवठा होणार आहे.
नागेवाडी – स्थापित क्षमता 4.2 मेगावाट
नागेवाडी तालुका तासगांव जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना नागेवाडी, अंजनी, वडगांव आणि लोकरेवाडी या गावातील सुमारे 1200 ते 1300 वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या 33/11 के.व्ही. अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च 15 कोटी आहे.महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत.
वाळेखिंडी – स्थापित क्षमता 3.36 मेगावाट
वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना वालेखिंडी, बेवनूर,सिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.सुमारे 8 हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च 12 कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. नजीकच्या महावितरणच्या 33/11 के.व्ही. वालेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडण्यात आला आहे.
या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी 10 ते 15 व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.3.30 प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.
आगामी काही महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी(जिल्हा-सांगली) 2 मेगावाट, कुंभोज(जिल्हा-कोल्हापूर) 4.4 मेगावाट, सोनगाव(जिल्हा-सातारा) 4.2 मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.आजघडीला महानिर्मितीच्या एकूण 376.42 मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशानुसार तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच 100 मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच आर्थिक वर्ष 2023-2024 करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत आहेत.












































































