Last Updated on 12 Dec 2023 8:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । दिवसभरात ऊस दर तोडग्यासाठीच्या दोन बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर रात्री उशिरा सांगली जिल्ह्यात ऊस दराचा तोडगा निघाला.दत्त इंडिया कारखाना आणि स्वाभिमानीमध्ये यशस्वी चर्चा झाली.दत्त इंडिया कारखान्याने एफआरपी आणि 100 रुपये देण्याचे मान्य केले.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्यात तब्बल 36 तासापासून सुरु असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
दरम्यान,वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी चर्चा केली.मात्र ही चर्चा सफल झाली नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाबरोबरच बैठक घ्यावी असा आग्रह धरला.त्यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकारी यांच्याशी कारखाना प्रशासनाने संपर्क साधून जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्याचा दुपारी निर्णय झाला.सायंकाळी प्रशासन,साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली.पण, ही बैठकही निष्फळ ठरली.बैठकीत काहीही ठोस निर्णय न झाल्याने राजू शेट्टी संतप्त झाले.
त्यानंतर आंदोलनस्थळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसमोर बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खा. राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसमोर बोलताना साखर कारखानदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.आता आरपारच्या लढाईला सज्ज व्हा असे आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले होते.
दत्त इंडिया कारखाना आणि स्वाभिमानीमध्ये रात्री उशिरा पुन्हा बैठक झाली.दत्त इंडिया कारखाना आणि स्वाभिमानीमध्ये यशस्वी चर्चा झाली.एफआरपी अधिक १०० रुपये देण्याचे मान्य केले. यासंदर्भात दत्त इंडियाच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा – ‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक…पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट
राजू शेट्टींना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पत्र
माजी खा.राजू शेट्टी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,आपले संघटनेमार्फत जिल्हयामध्ये ऊस दराचे अनुषंगाने आंदोलने सुरु आहेत. त्याअनुषंगाने व्हाईस प्रेसिडेंट,श्री दत इंडिया प्राईवेट लिमिटेड यांनी या कार्यालयास संदर्भीय पत्र दिले आहे. सदर पत्रामध्ये व्हाईस प्रेसिडेंट, श्री दत इंडिया प्राईवेट लिमिटेड यांनी आपले मागणीपेक्षा जास्त रक्कम देणे बाबत कटीबद्धता दर्शविलेचे नमूद करून आपले आंदोलन मागे घेणेबाबत या कार्यालयामार्फत विनंती केली आहे. सोबत संदर्भीय पत्र अवलोकनार्थ जोडले आहे.
तरी संदर्भीय पत्राचे अनुषंगाने आपली मागणी सदर संस्थेने मान्य केलेचे लेखी कळविलेने आपण आपले संघटने मार्फत सुरु असलेले आंदोलन मागे घ्यावे. व प्रशासनास सहकार्य करावे.








































































