Last Updated on 10 Dec 2023 10:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गेल्या 10 तासापासून कारखान्याच्या मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन सुरुच
सांगली । जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.आज,रविवारी उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यावर धडक दिली.यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.दरम्यान,गेल्या 10 तासापासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनने सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर धडक दिली.यावेळी कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला.

![]()
गेल्या 10 तासापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखाना समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. खुद्द माजी खासदार राजू शेट्टी याठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून 16 डिसेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानीचे बैठक लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र दत्त इंडिया कारखान्याकडून एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यासमोरुन उठणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टींनी केला आहे. तसेच माजी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम हे झारीतले शुक्राचार्य असल्याचा राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी आंदोलनावर ठाम
दत्त इंडिया साखर कारखान्यावर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांचा दर जाहीर न करण्याबाबत दबाव असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलंय. सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरु असलेले ठिय्या आंदोलन गेल्या 10 तासापासून सुरूच आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 आणि एफआरपी अधिक 100 रुपये दत्त इंडिया कारखान्याने जाहीर करावे, तेव्हाच या कारखान्या समोरचे आंदोलन मागे घेऊ यावर राजू शेट्टी ठाम आहेत.

दरम्यान,आंदोलन आणखी चिखळणार,अशी स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनस्थळी पंगत…

दरम्यान,ऊसदरासाठी शेतकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा वज्रनिर्धार केला आहे.कारखानदारांच्या दबावाला न जुमानता शेतकरी एकजुटीचा नारा बुलंद करत ‘मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही’असा पवित्रा घेतला आहे.आंदोलनाला दहा तास उलटल्यानंतरही प्रशासन आणि कारखानदारांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता.त्यामुळे सायंकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंगत बसली.माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांसोबत जेवण घेतले.पंचक्रोशीतील गावांनी शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय केली.आंदोलनस्थळी जेवण करून वाढण्यात आले.










































































