Last Updated on 11 Dec 2023 9:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी कायम : आता आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर
सांगली । सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी कायम राहिली आहे. ऊस दराची बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान,या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.आता आरपारच्या लढाईला सज्ज व्हा असे आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न रविवारपासून पेटला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.हे आंदोलन तब्बल 30 तासापासून सुरु आहे.कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा अशी संघटनेची मागणी आहे.एफआरपी अधिक 100 मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाबरोबरच बैठक घ्यावी असा आग्रह धरला.त्यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकारी यांच्याशी कारखाना प्रशासनाने संपर्क साधून जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्याचा दुपारी निर्णय झाला.सायंकाळी प्रशासन,साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली.पण, ही बैठकही निष्फळ ठरली आहे.बैठकीत काहीही ठोस निर्णय न झाल्याने राजू शेट्टी संतप्त झाले आहेत.
त्यानंतर आंदोलनस्थळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसमोर बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.ते म्हणाले,कोणत्याही क्षणी आंदोलनाचे टप्पे आम्ही जाहीर केल्याशिवाय सोडणार नाही.मग ते जिल्हाधिकारी असतील,पालकमंत्री असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल सोडणार नाही.या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला या कारखानदारांनी डिवचले आहे.
कोण आहेत हे असा सवाल करत शेट्टी म्हणाले,जिल्हाधिकारी बोलावत असतानाही कारखानदार 11 दिवस बैठकीला वेळ देत नाहीत असे कोण लागून गेले.तेही चर्चा करायला.निर्णय घ्यायला नाही.कारखानदारांची मस्ती जिरवायचा निर्णय आता घ्यावाच लागेल.म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल असा इशारा देतानाच शेट्टी यांनी आता आरपारच्या लढाईला सज्ज व्हा असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.










































































