Last Updated on 17 Dec 2023 9:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वाभिमानीचा प्रस्ताव अमान्य : कारखानदारांचा निर्णय 26 डिसेंबरपर्यंत होणार
सांगली । जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठीची तिसरी बैठकीही पहिल्या उचलीवर तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली.कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्यास 3250, साडेबारा उतार्याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील,असा अंतिम प्रस्ताव दिला.पण,बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले.तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानाने घेतला.या मुदतीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी बैठक झाली.या बैठकीला विश्वास कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक,क्रांतीचे शरद लाड,वसंतदादा कारखान्याचे विशाल पाटील,राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी,जिल्हाध्यक्ष महेश खराडे,संदीप राजोबा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी संघटनेने केली होती,परंतु जिल्ह्यातील कारखानदार 3100 रुपये पहिली उचल देण्यावर ठाम होते.मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला.त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली. त्यामुळे या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला.
जिल्ह्यातील ऊस दरासाठी कारखानदारांशी दोन तास चर्चा करुनही निर्णय झाला नाही, त्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कारखानदारांसमोर अंतिम प्रस्ताव सादर केला.कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करु असा इशारा देत शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.दरम्यान,तिसरी बैठकही निष्फळ ठरली.बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 26 मागितली आहे. त्यानुसार त्यांना माहिती देण्यात आली.मात्र 26 पर्यंत तोडगा निघाला नाही,तर प्रत्येक कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.











































































